‘मौलाना आझाद विचार मंच’ची मागणी 

मुंबई : लोकसभा वा विधानसभा निवडणुकांत मुस्लीम मतांची अपेक्षा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि अन्य निधर्मवादी पक्षांच्या आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीत किमान २५ मतदारसंघांमध्ये मुस्लिमांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मौलाना आझाद विचार मंच या संस्थेने केली आहे.

महाराष्ट्रात २०११च्या जनगणनेनुसार मुस्लिमांचे लोकसंख्येचे प्रमाण ११.५४ टक्के होते. गेल्या नऊ वर्षांत हे प्रमाण नक्कीच वाढले असणार. या तुलनेत मुस्लीम समाजाला राजकीय पक्षांकडून योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, असे मत काँग्रेसचे खासदार आणि मौलाना आझाद विचार मंचचे समन्वयक हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने फक्त एका मुस्लिमाला उमेदवारी दिली होती. मुस्लीम मते मिळावीत अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अपेक्षा असते, पण उमेदवारी देताना हात आखडता घेतला जातो, असे दलवाई यांचे म्हणणे आहे.

मौलाना आझाद विचार मंचच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात मुस्लिमांना राजकीय पक्षांकडून उमेदवारीत डावलण्यात येत असल्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. भाजप आणि शिवसेनेकडून अपेक्षाच नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, असा मुद्दा मांडण्यात आला. मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये किंवा ही मते धर्मनिरपेक्ष विचारांच्या उमेदवारांना मिळतील, असा प्रयत्न असतो. मुस्लीम समाजाला उमेदवारीत योग्य प्रतिनिधित्व दिल्यास समाजात अन्य पर्यायांचा विचारही होणार नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप किंवा आघाडीतील अन्य पक्षांनी राज्यातील २८८ पैकी किमान २५ मतदारसंघांमध्ये मुस्लीम कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी खासदार दलवाई यांनी केली आहे. मुस्लीम समाजाला चांगले प्रतिनिधित्व मिळाल्यास मुस्लीम समाजाच्या मतदारांमध्ये विश्वासाची भावना तयार होते, असेही दलवाई यांनी सांगितले.

मुस्लिमांना अधिक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, पण त्याच वेळी भाजपसारख्या जातीयवादी पक्षांचा फायदा होईल, अशा पद्धतीने मुस्लीम समाजाने मतदान करू नये, असे आवाहनही खासदार दलवाई यांनी केले आहे. भाजपचा फायदा व्हावा, या दृष्टीने मुस्लीम मतांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होतात. यासाठी काही राजकीय पक्ष भाजपला मदत करतात, असा आरोपही त्यांनी केला.