मॅक्स लाइफ इन्शुरन्स कं. लिमिटेडकडून (मॅक्स लाइफ/कंपनी) नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्व्हेक्षणानुसार, मुंबईकरांपैकी ७६ टक्के लोकांकडे आयुर्विमा आहे. मॅक्स लाइफ आणि कंतार आयएमआरबी यांनी संयुक्तरित्या केलेल्या इंडिया प्रोटेक्शन कोशंट या सर्वेक्षणात मुंबईचा प्रोटेक्शन कोशंट १०० पैकी ३९ असून शहरी भारताच्या राष्ट्रीय सरासरी ३५ पेक्षा तो अधिक आहे. या त्रिमितीय सर्वेक्षणाद्वारे विमा खरेदी करतेवेळी विमाधारकाची आयुर्विमा आणि मुदत विम्याबाबतची जागरुकता, मालकी आणि प्राथमिक भीती, पसंती आणि विमा खरेदी करतेवेळची प्रेरणा यांचा अभ्यास करून भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी विमाधारकाच्या आर्थिक तयारीच्या पातळीबाबत निष्कर्ष काढण्यात आले.

“भारताचे आर्थिक केंद्र असलेले मुंबई शहर आयुर्विमा संरक्षण आणि माहिती निर्देशांकात अन्य शहरांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे इंडिया प्रोटेक्शन कोशंट सर्वेक्षणातून दिसून आले. आयुर्विमाधारकांची टक्केवारी मुंबईत राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असली तरी मुदतविमा घेणाऱ्यांचे कमी असलेले प्रमाण ही चिंतेची बाब आहे. मुदतविमा हे सर्वात स्वस्त आणि अगदी मूळ स्वरुपाच्या आर्थिक संरक्षणाचे साधन आहे. जीवनाच्या अनिश्चिततेपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याचे महत्त्व जाणून घेऊन आयुर्विम्याचे संरक्षण घेण्याबाबत दृष्टिकोनात सुधारणा करण्यास येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे आयुर्विम्यासंदर्भात लोकांचा दृष्टिकोन आणि वर्तणूक बदलण्यास निश्चित मदत होईल, याची आम्हाला खात्री आहे”, असं मॅक्स लाइफचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. विश्वानंद यांनी म्हटलं आहे.

भारतातील शहरी भागांसाठीचे प्रोटेक्शन कोशंट (भविष्यातील असुरक्षिततेचा सामना करण्यासंदर्भात ० ते १०० या फुटपट्टीवर संरक्षित व मानसिकदृष्ट्या तयार असल्याची भावना) ३५ असून पश्चिम प्रदेशासाठी ते त्यापेक्षाही कमी, म्हणजे ३३ इतके आहे. मुंबईचे प्रोटेक्शन कोशंट त्या तुलनेत अधिक म्हणजे ३९ असून बंगळुरू, पुणे, कोलकाता, भुवनेश्वर या शहरांपेक्षा जास्त आहे.

या व्यतिरिक्त माहिती निर्देशांकाबाबत मुंबईचे गुण ४६ असून मुंबईतील नागरिक विमा या श्रेणीबाबत देशातील अन्य नागरिकांपेक्षा अधिक सजग असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणाला शहरातील प्रतिसादकर्त्यांपैकी अवघ्या १९ टक्के लोकांकडे मुदतविमा, शहरातील जवळपास निम्म्या प्रतिसादकर्ते मुदतविम्याच्या लाभांबाबत अनभिज्ञ आयुर्विमाधारणाची राष्ट्रीय सरासरी ६५ टक्के असून पश्चिम भागातील आयुर्विमा आणि मुदतविमाधारणाचे प्रमाण कमी (अनुक्रमे ५७% व १६%) असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. त्या तुलनेत पूर्व (७२% व २४%), उत्तर (५९% व २२%), दक्षिण (७४% व २४%) आणि देशाची सरासरी (६५% व २१%) अधिक आहे.

मुंबईतील ७६ टक्के प्रतिसादकर्त्यांकडे आयुर्विमा असून ६५ टक्के राष्ट्रीय सरासरीपेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. मात्र,अवघ्या १९ टक्के प्रतिसादकर्त्यांकडे मुदतविमा असल्यामुळे भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्याबाबत हे शहर पुरेसे तयार नाही. मुदतविम्याबाबत मुंबईकरांची जागरुकता केवळ ५१ टक्के असून शहरी भारतातील हे प्रमाण ४७ टक्के असल्यामुळे ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

गंभीर आजारांशी सामना करण्यासाठी शहर आर्थिकदृष्ट्या तयार नाही
आयुर्विमाधारणाचे प्रमाण कमी असून पश्चिम प्रदेशातील अनेकजणांना असे वाटते की घरातील कर्ती व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास बचतीची रक्कम एक वर्षापर्यंत पुरू शकेल, तर ८० टक्क्यांहून अधिक लोकांना गंभीर आजारपणावरील उपचारांमुळे पैसे संपल्यास अथवा मृत्यू झाल्यास मित्र, कुटुंबीय व सहकारी आर्थिकदृष्ट्या मदत करतील, असे वाटते.

मुंबईतील ८७ टक्के प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की, त्यांना काही गंभीर आजाराचे निदान झाले तर आर्थिकदृष्ट्या कोणीतरी निश्चित मदत करेल. २० टक्क्यांहून कमी लोक असे आहेत, ज्यांना या आजारांवरील उपचारांच्या खर्चाचा अंदाज नाही. गंभीर आजारामुळे कुटुंब अडचणीत येऊ शकते, याची जाणीव १७ टक्के लोकांना आहे, तर ३६ टक्के लोकांनी याचा विचारदेखील केलेला नाही.

गंभीर आजार झाला किंवा मृत्यू ओढवला तर बचतीची रक्कम वर्षभर पुरेल, असे २१ टक्के मुंबईकर प्रतिसादकर्त्यांना वाटते. गंभीर आजार अथवा मृत्यू ओढवला तर आपल्याला मदत करणारे कोणी नाही, असे ११ टक्के लोकांना वाटते.

पश्चिम भारतात पुरुष व महिलांमध्ये विमा बचत पद्धतीत समानता
शहरी भारतात आयुर्विमा आणि मुदतविमाधारकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण कमी आहे. शहरी भारतात ६८ टक्के पुरुषांच्या तुलनेत ५९ टक्के महिलांकडे आयुर्विमा आहे, तर २२ टक्के पुरुषांच्या तुलनेत १९ टक्के महिलांकडे मुदतविमा आहे. पश्चिम भारतातील पुरुष व महिलांमध्ये आयुर्विम्याबाबत असलेले अंतरही सर्वेक्षणाने ठळकपणे दाखवून दिले. ६० टक्के पुरुषांच्या तुलनेत ५० टक्के महिलांकडे आयुर्विमा आहे, तर १६ टक्के पुरुषांच्या तुलनेत फक्त १४ टक्के महिलांकडे मुदतविमा आहे. याखेरीज, पश्चिम भारतातील ३९ टक्के महिला व पुरुष मूलभूत खर्चापोटी त्यांचे उत्पन्न खर्च करतात. या प्रांतातील महिला व पुरुषांचे बचतीबाबतचे उद्दिष्टही जवळपास सारखेच आहे. ६२ टक्के पुरुष व महिला वृद्धापकाळ आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करतात.

भविष्य, वृद्धापकाळातील सुरक्षिततेसाठी बचतीला पश्चिम भारतातील सहस्त्रावधींचे प्राधान्य
शहरी भारतातील २५ ते ३० वयोगटातील सहस्त्रावधी लोक प्रवास आणि चैनीसाठी खर्च करतात. ४३ टक्के लोक आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेबाबत विचारही करत नाहीत, असे सर्वेक्षणात आढळून आले. केवळ ४४ टक्के तरुणांना मुदतविम्याबाबत माहिती असून केवळ १७ टक्के तरुणांकडे मुदतविमा आहे. तब्बल २२ टक्के शहरी भारतीय तरुण अन्य प्रकारच्या गुंतवणुकीमुळे आयुर्विमा खरेदीचा विचार देखील करत नाहीत, असे आढळून आले आहे.

पश्चिम भारतातील तरुण देशाच्या अन्य शहरी भागापेक्षा आर्थिक संरक्षणाला अधिक प्राधान्य देतात. या प्रदेशातील सहस्त्रावधी लोक सुट्टीतले फिरणे (१२%) अथवा गाडी खरेदी (१३%) यापेक्षा निवृत्तीनंतरचे आयुष्य/वृद्धापकाळासाठीचे संरक्षण यासाठी अधिक बचत करतात (५९%).

मात्र, केवळ ४१ टक्के प्रतिसादकर्त्यांना मुदतविम्याबाबत माहिती असून केवळ १५ टक्क्यांकडे मुदतविमा आहे. या प्रदेशातील सहस्त्रावधी लोकांपैकी १९ टक्के लोक अन्य प्रकारच्या गुंतवणुकींमुळे मुदतविमा खरेदीचा विचारदेखील करत नाहीत.

५० टक्क्यांहून अधिक शहरी भारतीयांसाठी घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाबाबतची सर्वात मोठी भीती म्हणजे आर्थिक असुरक्षितता आणि सध्याच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम ही असते, असे सर्वेक्षणात आढळून आले. या तुलनेत पश्चिम भारतातील ५१ टक्के लोकांना सध्याच्या उत्पन्नात कुटुंबाची सध्याची जीवनशैली कायम ठेवण्याबाबत चिंता वाटते, तर ४९ टक्के लोक मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेबाबत चिंता करतात.