सिंधुदुर्गात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ  कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २३ लाख मतदारांची संख्या असलेला ठाणे मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदार संघ ठरला आहे.  राज्यात महिला मतदारांची जास्त संख्या असलेला सिंधुदुर्ग-रत्नागिरी हा मतदारसंघ आहे.

सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून एकूण १४ लाख ४० हजार मतदारांमध्ये ७ लाख ३५ हजार ५९७ इतकी  महिला मतदारांची संख्या आहे.

मावळ मतदारसंघात सुमारे  २२ लाखांहून अधिक, शिरूरमध्ये २१ लाखांहून अधिक, नागपूर २१ लाखांहून अधिक, पुणे आणि बारामती प्रत्येकी २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

मुंबईतील मुंबई—उत्तर मतदारसंघात १६ लाखांहून अधिक मतदार असून मुंबई उत्तर दक्षिण मतदारसंघात १६ लाख ९८हजार मतदार आहेत. तर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात १५ लाख ५८  हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात १६  लाख ४८ हजार आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात १४ लाख १५ हजार एवढे मतदार आहेत.

मंत्रालयात नियंत्रण कक्ष

राज्यात लोकसभेसाठी ११, १८, २३ व २९ एप्रिल अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मेला होऊन २७ मे ला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी मंत्रालयात २४  तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. मंत्रालयात पाचव्या मजल्यावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, यांच्या कार्यालयात सुरु करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी . ०२२—२२०४०४५१ आणि २२०४०४५४ असा आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.