मुंबई : खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीला अंकुश लावत या रुग्णालयांसाठी लशींचे कमाल दर केंद्रीय आरोग्य विभागाने निश्चित केले आहेत. लशीच्या एका मात्रेचे कोव्हिशिल्डसाठी ७८० रुपये, कोव्हॅक्सिनसाठी १ हजार ४१० रुपये तर स्पुटनिकसाठी १ हजार १४५ रुपये असे कमाल दर केंद्राने जाहीर केले असून हे दर मंगळवारपासून अमलात आले आहेत.

लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार उत्पादनापैकी २५ टक्के  साठा खासगी रुग्णालयांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. आत्तापर्यंत ५० टक्क्यांपर्यंत साठा खासगी रुग्णालयांना खुला केला होता. याचाच फायदा घेत रुग्णालयांनी साठेबाजी करून नफेखोरी सुरू केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १३ मे रोजी ‘नफेखोरीची मात्रा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. खासगी रुग्णालयांच्या या नफेखोरीला रोखण्यासाठी अखेर केंद्राने लसीकरणाच्या नव्या धोरणामध्ये लशींच्या किमतीवर नियंत्रण आणले आहे. उत्पादकांनी जाहीर केलेल्या किमतीवर कमाल १५० रुपयांपर्यंत सेवा शुल्क लावण्याची मुभा खासगी रुग्णालयांना दिली आहे. त्यानुसार उत्पादकांनी जाहीर केलेल्या किमती, ५ टक्के  वस्तू व सेवा कर आणि १५० रुपये सेवा शुल्क अशी एकत्रित कमाल किंमत प्रत्येक लशीसाठी आरोग्य विभागाने निश्चित केली आहे.

नवे दर मंगळवारपासून म्हणजे ८ जूनपासून लागू झालेले असून यापेक्षा अधिक दर आकारण्याची मुभा खासगी रुग्णालयांना नाही. कोविनमध्येही त्यानुसार बदल केलेले असून कमाल दरांपेक्षा अधिक किंमत रुग्णालयांना आकारता येणार नाही. त्यामुळे आता यापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांना नव्या दरानुसारच बुधवारपासून लसीकरण करणे सक्तीचे असणार आहे.

खासगी रुणालयांवर देखरेखीचे आदेश

कमाल दरापेक्षा अधिक किमतीने खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात आहे का यावर राज्य सरकारने लक्ष ठेवावे. असे आढळल्यास त्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना दिले आहेत.