News Flash

“भविष्यात मनसे भाजपासोबतही जाऊ शकते”

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे संकेत

संग्रहित छायाचित्र

भविष्यात मनसे भाजपासोबतही जाऊ शकते असं वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. मनसेचे पहिलं महाधिवेशन मुंबईत होणार आहे. मनसेच्या झेंड्यात बदल करण्यात आला आहे. तसाच तो धोरणांमध्येही होईल अशीही चर्चा आहे. अशा सगळ्या वातावरणात बाळा नांदगावकर यांनी केलेलं वक्तव्य सूचक आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की ” यापूर्वी आम्ही शिवसेनेला मदत केली, तसंच भाजपालाही मदत केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मदत केली. आम्हाला कोणी मदत केली ते सगळ्यांना माहित आहेच. त्यामुळे भविष्यात कुणासोबत जायचं हा निर्णय राज ठाकरे घेतील. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, त्यामुळे लोकांच्या मनात आहे ते घडनाता दिसतं आहे ” असं म्हणत भाजपा आणि मनसे एकत्र येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत.

दरम्यान “ज्या पक्षाचा भूतकाळ आणि वर्तमान पाहिला तर सध्या त्या पक्षाची चर्चाही नाही. मात्र भविष्यात काहीही होऊ शकतं. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यात काहीही अडचण नाही. भाजपा आणि मनसे यांची विचारधारा वेगळी आहे. कार्यकर्त्यांमध्ये विसंगती आहे. असं असलं तरीही भविष्यात मनसेची ध्येयं धोरणं बदलली तर काहीही होऊ शकतं” अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार राम कदम यांनी दिली.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. हे तीन पक्ष एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. आता भाजपालाही प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका स्वीकारली तर मनसे आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. पक्षाला १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काळानुसार काही बदल करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं असंही बाळा नांदगावकर म्हणाले. तसंच २३ जानेवारीला राज ठाकरे त्यांची भूमिका सगळ्यांसमोर मांडतील आणि सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपा एकत्र येणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी १० सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला या विरोधी प्रचाराचा काहीही फरक पडला नाही. कारण देशात ३०३ जागा मिळवत पुन्हा भाजपाचीच सत्ता आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणीही त्यांनी केली होती. आता एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर मनसेने जरी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले असले तरीही भाजपा मनसेला स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 7:18 pm

Web Title: may mns go with bjp in future says bala nandgaonkar scj 81
Next Stories
1 ‘या’ चोरांपासून व्हा सावधान; लष्करी अधिकाऱ्याचे नाव सांगून काढतात पैसे
2 औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील २८ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या
3 जालना जि.प. निवडणुकीतून भाजपाची माघार; महाविकासआघाडीचा सत्ता
Just Now!
X