राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते अशी ओळख असलेले गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते सागर नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीत भाजपा प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत. असे घडले तर राष्ट्रवादीसाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर चित्रा वाघही भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यानंतर आता तिसरा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हं आहेत.

ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी रविवारी गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करा, अशी मागणी केली. त्यानंतर घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही आनंद परांजपे हे ४५ हजार मतांनी मागे होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. आता गणेश नाईक काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे मुंबईतले नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दोनच दिवसांनी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. त्या ३० जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ आता गणेश नाईकही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

पुण्यात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. ईडीच्या कारवाईची धमकी देत, दबाव आणत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडलं जातं आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे.