मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र या अफवांचं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खंडन केलं आहे. माझी प्रकृती ठणठणीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“मी जिवंत आहे आणि माझ्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. थोड्याच वेळापूर्वी मी डाळ-खिचडीही खाल्ली. अशी बातमी छापणे दुर्दैवी आहे. बातमी देण्यापूर्वी ती बातमी खरी की खोटी याबाबत एकदा शहनिशा करा”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी लिहीलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. महापौर कार्यालयाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काल रात्रीपासून (१७ जुलै) त्यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर सकाळी त्रास अधिक वाढल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात महापौरांना दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मुंबईत मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली. रात्री आपल्याला घटनास्थळी जाता आलं नाही, असं सांगत त्यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र,त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज मिळेल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.