News Flash

‘महापौर निवासा’त शिवसेनाप्रमुखांचे स्मारक

बाळासाहेबांच्या स्मारकामुळे महापौर निवासस्थान अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे लागणार आहे.

महापौर बंगल्याच्या ऐतिहासिक वारसा (हेरिटेज) वास्तूच्या परिसरातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांची घोषणा; उद्धव ठाकरे स्मारक न्यासाचे अध्यक्ष
दादर चौपटीवर समुद्र किनाऱ्याला लागून असणाऱ्या महापौर बंगल्याच्या ऐतिहासिक वारसा (हेरिटेज) वास्तूच्या परिसरातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. राज्य सरकारच्या अधिपत्याखाली एक सार्वजनिक स्मारक न्यास स्थापन करण्यात येणार असून, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याचे अध्यक्ष असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महौपार बंगल्याच्या हिरवळीवर मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्मारकाची अधिकृत घोषणा केली. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दादर येथील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या महौपार बंगल्याची निवड करण्यात आली आहे. हा बंगला हेरिटेज वास्तू असल्यामुळे तो पाडण्यात येणार नाही, बंगल्याची मूळ रचना तशीच ठेवून आत व बाहेरच्या परिसरातच स्मारकाची उभारणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री व ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या स्मारकाच्या उभारणीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या धर्तीवर राज्य सरकारच्या अखत्यारित स्मारक न्यासाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. न्यासाचे अन्य सदस्य उद्धव यांच्या सल्ल्याने निवडले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. हे स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल, असे उद्धव यांना विचारले असता, बाळासाहेबांचे उत्तम स्मारक असेल, त्याच्या कालमर्यादेचा आता विचार केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान बाळासाहेबांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर मोठय़ा संख्येने शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसेच उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बाळासाहेबांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शिवसैनिकांनीही रांगा लावून शिस्तबद्धपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

महौपारांसाठी पर्यायी जागा
बाळासाहेबांच्या स्मारकामुळे महापौर निवासस्थान अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे लागणार आहे. पर्यायी निवासास्थानासाठी भायखळा येथील जिजामाता उद्यानातील एक जुना बंगला किंवा पालिका आयुक्तांच्या बंगला अशा दोन वास्तूंचा विचार केला जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत काही भाष्य न करता महापौरांचा मान-सन्मान, दर्जा कायम राहिल अशा पर्यायी निवास्थानाची व्यवस्था केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 5:47 am

Web Title: mayors bungalow to house memorial for bal thackeray
Next Stories
1 तिकीट लिपिक महिलेचे निलंबन
2 मुंबईकरांना थंडीची आणखी प्रतीक्षा
3 सध्याचा काळ असहिष्णुतेचा!
Just Now!
X