हे काय सुरू आहे या देशात? आसाराम बापू नावाच्या भोंदूविरोधात तक्रार करणारे एकापाठोपाठ एक मारले जातात, आशुतोष महाराज नामक असाच कोणी मेला तरी त्याचे भक्त म्हणतात गुरू सखोल ध्यानात आहेत आणि म्हणून तीन वर्षे झाली तरी त्याचे कलेवर शीतकपाटात सरकारी खर्चाने राखले जाते, उत्तर प्रदेशात कोणी एक योगी म्हणवणारा स्वत:ची खासगी सेनाच उभी करतो आणि मुख्यमंत्रिपद हिसकावून घेतो, सर्व कायदे खुंटीवर टांगून कोणी एक श्री यमुनेच्या पात्रातच मेळावा भरवतो आणि पर्यावरणाचे नुकसान केले म्हणून दंडदेखील भरायला नकार देतो, पंतप्रधानच त्याच्या कार्यक्रमाला जातात, महाराष्ट्रातला एक स्वत:ला शंकराचार्य म्हणवून घेत अमाप माया जमा करतो आणि मंत्रीसंत्री त्याच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत निर्लज्जपणे त्याच्या पायावर डोके ठेवतात, औषधनिर्मितीचा कोणताही अनुभव नाही. कथित औषधी उत्पादनांची कोणतीही चाचणी नाही, तरीही एक कफनीधारी बाबा उठतो आणि तीन वर्षांत तब्बल १० हजार कोट रुपयांची औषधे आणि खाद्यान्न कंपनी उभी करतो, साक्षात गुंड वाटावा अशा भडक, बटबटीत, गुरूबाबाची मदत थेट पंतप्रधान घेतात, त्याच्या कर्तृत्वाचे(?) गोडवे गातात आणि या बाबाचे पितळ उघडे पाडणाऱ्या पत्रकाराची हत्या होते. असे किती दाखले द्यावेत? बाबा रामरहीम असे तद्दन फिल्मी आणि फोकनाड नाव धारण करणाऱ्या बाबाच्या अटकेने हरयाणात जो काही उत्पात सुरू आहे तो पाहिल्यावर या देशात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. देश म्हणून आपण व्यवस्थाशून्यता क्वचित अनुभवतोच; पण आता सर्रास विधिनिषेधशून्यही होऊ  लागलो आहोत हे अशा वारंवार घडणाऱ्या घटनांतून दिसून येते, असे मत ‘बाबा प्रजासत्ताक’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर अहिरे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयाची विद्यार्थिनी अर्चना सुरवसे हिने दुसरे पारितोषिक पटकावले.

मयूरला सात हजार आणि प्रमाणपत्र, तर अर्चनाला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.