पुराव्यांअभावी मोक्का न्यायालयाचा निकाल

मुंबई : माजी आमदार मंगेश सांगळे आणि त्यांच्या कुटुंबाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या पाच आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयाने निर्दाेष ठरवले. गुन्हे शाखेने या गुन्ह्य़ात संघटित टोळीचा म्होरक्या कुमार पिल्ले, रामदास राहणे, विनोद घोगळे ऊर्फ साई यांना अटक केली होती. सुनावणीदरम्यान सांगळे आणि त्यांचे बंधू अरविंद यांनी साक्ष फिरवली होती.

सांगळे यांचे बंधू बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे विक्रोळी परिसरात काही प्रकल्प सुरू होते. २०१३ मध्ये एक तरुण विक्रोळी येथील सांगळे यांच्या निवासस्थानी आला, त्याने मोबाइलवर पिल्लेसोबत सांगळे यांचे बोलणे करून दिले. पिल्ले याने विक्रोळी परिसरात सुरू असलेल्या बांधकामावरून धमकावले आणि खंडणीची मागणी केली, अशी तक्रार सांगळे यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली. आमदाराच्या घरी येऊन धमकी दिल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेच्या घाटकोपर कक्षाने पिल्ले, राहाणे, घोगळेसह किरण नलावडे, प्रफुल्ल बगाडिया या पाच आरोपींना मोक्कान्वये अटक केली. मात्र खटल्याच्या सुनावणीदरम्यान या प्रकरणातील फिर्यादी अरविंद सांगळे, मंगेश सांगळे, त्यांचे नातेवाईक आणि घरकाम करणाऱ्या महिलेने साक्ष फिरवली. असे असूनही सांगळे कुटुंबाला अटक आरोपींनीच धमकावले, खंडणी मागितली हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न गुन्हे शाखेने के ला. या प्रसंगानंतर सांगळे यांनी मागितलेले पोलीस संरक्षण, स्वसंरक्षणार्थ शस्त्र विकत घेण्यासाठी के लेल्या अर्जाचा आधार गुन्हे शाखेने घेतला होता.

‘पुरावे गुन्हा सिद्ध करणारे नाहीत’

मात्र हे पुरावे संशयापलीकडे जाऊन आरोपींचा गुन्हा सिद्ध करणारे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत मोक्का न्यायालयाचे न्या. आर. आर. भोसले यांनी सर्व आरोपींनी निर्दाेष सोडले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. महेश मुळये यांनी काम पाहिले.