शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी स्मृती उद्यान उभारण्यास महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) अखेर गुरुवारी मान्याता दिली. हे उद्यान सर्वासाठी खुले राहणार आहे.
बाळासाहेबांच्या समाधीस्थळी चौथरा उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने काही महिन्यापूर्वी एमसीझेडएमएला दिला होता. मात्र शिवाजी पार्क सीआरझेडमध्ये येत असल्याने त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यास अनुमती देता येणार नाही. मात्र सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावास अनुमती देता येईल, अशी भूमिका घेत एमसीझेडएमएने महापालिकेला फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार याठिकाणी बाळासाहेबांचा स्मृती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला. त्याच बरोबर राज्य सरकारने या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करणारे पत्र मुख्य सचिवांना पाठवून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या ८६ व्या बैठकीत स्मृती चौथऱ्याच्या मुद्दा घेण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत आयुक्तांकडून काही खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र या बैठकीस स्वत: कुंटेच उपस्थित न राहिल्याने ती रद्द झाली. त्यानंतर पुन्हा विशेष बैठक बोलाविण्याची विनंती महापालिकेने एमसीझेडएमएला केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
“या ठिकाणी चौथऱ्या ऐवजी उद्यान उभारण्याचा आणि सीआरझेडच्या सर्व नियमांमध्ये बसणारा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. त्यामुळे सार्वजनिक सुविधा म्हणून या प्रस्तावास मान्यता देण्यात आली़.”
आर. ए. राजीव, अध्यक्ष, एमसीझेडएमए