एमडी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम

मुंबई : जगभरातील वैविध्यपूर्ण रंगभूमीविषयी माहिती देणारा ‘वर्ल्ड थिएटर कलेक्शन’ हा उपक्र म महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘नाटय़ांगण’च्या विद्यार्थ्यांनी सुरू के ला आहे. याद्वारे विद्यार्थी जगभरातील रंगभूमीच्या वैविध्याबद्दल प्रेक्षकांना सोप्या शब्दात माहिती देत आहेत. कलाकारांकडूनही या उपक्र माला दाद मिळते आहे.

जगभरात रंगभूमीचे  ‘प्रोसेनियम’, ‘थ्रस्ट’, ‘एरेना’, ‘ब्लॅक बॉक्स’, ‘प्लॅटफॉर्म स्टेज’, ‘हिप्पोड्रोम्स’, ‘ओपन इन थिएटर’ असे अनेक प्रकार आहेत. मुंबईतील यशवंत, रवींद्र नाटय़मंदिर हे प्रोसेनियम तर पृथ्वी थिएटर हे थ्रेस्ट प्रकारात मोडतात. याच जगभरातील रंगभूमीची विविधता या उपक्र मात पाहायला मिळते. आतापर्यंत या मालिकेतील अमेरिकेतील एरेना आणि लंडन येथील थ्रस्ट प्रकारच्या रंगभूमीची माहिती देणारे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. पुढील भागात ब्लॅक बॉक्स आणि प्रोसेनियमबद्दल माहिती दिली जाईल. यात रंगभूमीची आसनव्यवस्था, विंग, प्रवेश करण्याची जागा, सादरीकरण कसे करावे आणि त्याची उदाहरणे या गोष्टींविषयी माहिती दिली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगभूमीची प्रतिकृतीही तयार केली आहे.

प्रत्येक भागात नाटय़सृष्टीतील नावाजलेला नट रंगभूमीविषयी आपले अनुभव सांगतो. पहिल्या भागात अभिनेता आशुतोष गोखले आणि समीर खांडेकर यांनी आपले अनुभव कथन केले आहेत. या उपक्रमाबद्दल ‘नाटय़ांगण’चा समन््वयक उज्ज्वल कानसकर याने सांगितले की, ‘टाळेबंदीत आम्ही रंगभूमी आणि नाटकाविषयी अभ्यास करत होतो. रंगभूमीचा नुसता अभ्यास करण्यापेक्षा त्याचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरण केल्यास समजण्यासही सोपे होईल आणि नवीन विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून वापरता येईल, या विचाराने आम्ही हा उपक्रम सुरू केला. घरीच सुरक्षेच्या उपाययोजनांसह भाग चित्रित करत आहोत. याचा फायदा आम्हाला महाविद्यालयीन नाटय़स्पधरंसाठी होईल.’ या उपक्रमाची संकल्पना रोहित मोहिरे याची असून यश पवार आणि गुरूप्रसाद गंगा यांनी दिग्दर्शन केले आहे. या भागांसाठी छायाचित्रण रोहित शिंदे तसेच रोहित लाड, गौरव बहुतुले यांनी लेखन केले आहे.

रोहिणी हट्टंगडी यांच्याकडून कौतुक

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी ‘वर्ल्ड थिएटर कलेक्शन’चे कौतुक केले आहे. आजच्या तरुण पिढीला देशातील रंगभूमीच्या वैविध्याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. मुलांचा उपक्र म स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यात रंगभूमीवर सादरीकरण केलेल्या अभिनेत्याचीही मुलाखत पाहण्यास आवडेल, असे त्या म्हणाल्या. या उपक्रमाला अमेरिकेतील एका कलाकाराचेही सहकार्य लाभले आहे.