देवेंद्र फडणवीस यांचा दृढविश्वास, ‘लोकसत्ता’च्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक

युतीबाबत साशंकता असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधक एकवटल्याचे आव्हान उभे राहिले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘पुढील वर्षीही मीच मुख्यमंत्रीपदी असेन,’’ असा दृढविश्वास ‘लोकसत्ता‘ च्या ७१ व्या वर्धापन दिन समारंभात व्यक्त केला.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने न झुकता निर्भीड पत्रकारिता ‘लोकसत्ता‘ करीत असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

एक्स्प्रेस टॉवरमध्ये मंगळवारी झालेल्या या दिमाखदार वर्धापनदिन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ‘लोकसत्ता वर्षवेध‘ चे प्रकाशनही करण्यात आले.

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राजकीय कोपरखळ्या आणि टोलेबाजी रंगली. मुख्यमंत्री फडणवीस सरकारचे आता हे शेवटचे वर्ष आणि लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना भविष्यात राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहणार आणि सत्ता कोणाची येणार, याची चर्चा तर रंगतच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. गेली चार वर्षे मी मुख्यमंत्री या नात्याने वर्धापनदिन समारंभास उपस्थित रहात आहे आणि पुढील वर्षीही मीच मुख्यमंत्री असेन, असा दृढ विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस हे भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होतील आणि केंद्रात जातील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. त्या चर्चेला पूर्णविराम देत, ‘मी सध्या नवी दिल्लीला जाणार नाही, मुख्यमंत्री म्हणूनच कार्यरत राहणार,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘लोकसत्ता’ करीत असलेल्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचे कौतुक करून फडणवीस म्हणाले, की कोणत्याही राजकीय पक्षाकडे न झुकणारे हे वृत्तपत्र आहे. त्यामुळे त्याचा त्रास साहजिकच सरकारला अधिक होतो. आम्हाला अनेकदा खुलासे आणि स्पष्टीकरण करावे लागते, अशी दिलखुलास दादही फडणवीस यांनी दिली.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले. रसिका मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.