• ‘मी टू’पासून अनभिज्ञ असलेल्या कष्टकरी महिलांसाठी समुपदेशन समिती
  • घरकामगार महिलांना होणारे त्रास; अश्लील शेरेबाजी, लैंगिक शोषण, चोरीचे आरोप

जगभरातील महिलांवरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या ‘मी टू’च्या मोहिमेला भारतातूनही बळ मिळाले असले तरी, आतापर्यंत ही मोहीम भारतातील उच्चभ्रू वर्गातील महिलांपुरतीच मर्यादित राहिली आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होण्याच्या प्रकारांना सातत्याने सामोरे जाणाऱ्या घरकामगार महिलांचा आवाज अजूनही ‘मी टू’तून उमटलेला नाही. या पाश्र्वभूमीवर कष्टकरी महिलांवरील लैंगिक, मानसिक आणि आर्थिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी घरेलू कामगार संघटनेने समुपदेशन समिती स्थापन केली आहे.

सध्या संपूर्ण देशभरात ‘मी टू’ नावाचे वादळ उठले आहे. अनेक क्षेत्रांतील महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबाबत फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांद्वारे तक्रार करीत आहेत. मात्र यामध्ये उच्चभ्रू वर्गातील, सुशिक्षित आणि समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. घरकाम करणाऱ्या कष्टकरी महिलांना ‘मी टू’ मोहिमेची माहितीच नसल्याने त्यांच्यावरील अत्याचाराची प्रकरणे अजूनही पडद्याआड आहेत. या महिलांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते. मात्र त्याविरोधात कुठेच तक्रार होत नाही. या महिलांना बोलते करण्यासाठी घरेलू कामगार संघटनेने समुपदेशन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. तक्रार केल्यानंतर नोकरी गमवावी लागेल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळे या महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता करणे टाळतात. त्यातूनही एखाद्या महिलेने धैर्य दाखवून तक्रार केलीच तर तिच्यावर दबाव टाकण्यात येतो. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जातो. त्यामुळे त्या तक्रारच करत नाहीत. त्यासाठी महिला कार्यकर्त्यांचा समावेश असलेली समुपदेशन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती घरकामगार संघटनेचे अध्यक्ष उदय भट यांनी दिली. या महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ही समिती करेल, असे ते म्हणाले. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी वारंवार संपर्क साधून, तसेच लघुसंदेश पाठवूनही त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.

सामाजिक कार्यकर्त्यां मेधा थत्ते म्हणाल्या, ज्या महिला २४ तास सेवा देण्यासाठी काम करतात त्यांना सर्वाधिक त्रास होतो. त्यापैकी बहुतांश महिला परराज्यांतून आलेल्या असतात. त्यांना झोपायला व्यवस्थित जागा दिली जात नाही, त्यांना कधीच सुट्टी मिळत नाही, त्यांना बाहेर जाण्याची, कोणाशी संपर्क साधण्याची मुभा मिळत नाही. अशा वेळी त्या महिला एकटय़ा पडतात. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले तरी त्यांना कुठेच व्यक्त होता येत नाही. पगार थेट घरी जात असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा वेळी त्या पळूनही जाऊ शकत नाहीत. अनेक वेळा वृद्धांकडून या महिलांचा छळ होत असतो.