मुसळधार पावसालाही तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा रेल्वेने केला असला तरी पावसाच्या आगमनाच्या सरींनीच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे शनिवारी हाल झाले. सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, पेंटोग्राफ आणि रेल्वे गाडीत बिघाड झाल्याने रेल्वेसेवा खोळंबली. यात तिन्ही मार्गावर तब्बल ९० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मध्य रेल्वेवर ओव्हरहेड वायरमध्ये ठिणग्या उडाल्याने, हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आणि पश्चिम रेल्वेवर एकाच वेळी एका मार्गावर अनेक बिघाड झाल्याने लोकल सेवेचा शनिवारी बोजवारा उडाला. सकाळी ९ च्या सुमारास मुलुंड स्थानकात लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये ठिणग्या उडल्याने वीजप्रवाह खंडित झाल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या व जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने रेल्वे मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या, मात्र त्यानंतर पेंटोग्राफमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि गाडय़ा पूर्ववत झाल्याची घोषणा केली जात होती. मात्र सकाळी झालेल्या घटनेचे परिणाम सायंकाळी उशिरापर्यंत जाणवत होते. तर दुसरीकडे हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावर वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती. त्यामुळे मध्य रेल्वेप्रमाणे हार्बर मार्गावरही प्रवाशांची गर्दी झाली होती.
याच वेळी पश्चिम रेल्वे मार्गावर एकाच वेळी अनेक तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दोन रेल्वे बिघाड दुरुस्त करून चालवण्यात आल्या. तर दोन लोकल डिझेल इंजिन लावून मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये पाठवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांनाही तीव्र नाराजी व्यक्त केली. बुलेट ट्रेनचे वायदे सुरू असताना काही सरींमुळे रेल्वेची वाहतूक कोलमडत असेल तर रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकचा काय उपयोग, असा संतप्त प्रश्न प्रवासी उपस्थित करत होते.