28 May 2020

News Flash

पालिकेचा यांत्रिक शस्त्रक्रिया विभाग कागदावरच!

प्रशिक्षणातील क्लिष्टता आणि आर्थिक व्यवहार्यतेमुळे अंमलबजावणीत अडथळे

(संग्रहित छायाचित्र)

पालिकेचे राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय आणि वडाळा येथे उभारण्यात येणाऱ्या स्कील डेव्हलपमेन्ट सेंटरमध्ये यांत्रिक शस्त्रक्रिया (रोबोटिक सर्जरी) विभाग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र अंमलबजावणीतील त्रुटी दाखवीत नगरसेवकांनी प्रशासनाने यांत्रिक शस्त्रक्रियेबाबत सादर केलेले अभिप्राय धुडकावून लावले. आता प्रशासनाने पुन्हा एकदा अभिप्राय सादर केला असून, यांत्रिक शस्त्रक्रियेच्या क्लिष्ट प्रशिक्षणाबाबत विचारविनिमय करून आणि तिची आवश्यकता आणि आर्थिक व्यवहार्यता पडताळून योग्य तो निर्णय घेणे उचित ठरेल, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे नगरसेवक हा अभिप्राय स्वीकारतात की पुन्हा फेटाळतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुंबई पालिकेतर्फे चार वैद्यकीय महाविद्यालये चालविण्यात येत असून, दरवर्षी सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यांना अत्यावश्यक आणि नव्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्य देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर यांत्रिक शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. पालिका रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही यांत्रिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिल्यास त्याचा फायदा गरीब रुग्णांना होऊ शकेल. त्यामुळे पालिकेने यांत्रिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात केली जात होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पालिका सभागृहात मांडलेली ठरावाची सूचना एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आली होती.

नगरसेवकांनी पहिला अभिप्राय धुडकावून लावल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाने आपला अभिप्राय सादर केला. त्यानुसार पालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयात यांत्रिक शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वडाळा येथे उभारण्यात येणाऱ्या स्कील डेव्हलपमेन्ट सेंटरमध्ये सिम्युलेटिंग लॅबसह यांत्रिक शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे दुसऱ्या अभिप्रायात नमूद करण्यात आले. मात्र प्रशिक्षणाबाबत कोणताच उल्लेख नसल्याने हाही अभिप्राय नगरसेवकांनी फेटाळून लावला.

आता प्रशासनाने तिसऱ्यांदा अभिप्राय सादर केला आहे. नगरसेवक आता हा अभिप्राय स्वीकारतात की पुन्हा फेटाळतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया?

यांत्रिक शस्त्रक्रिया ही परिणामांबाबत अध्ययन व समीक्षा पातळीवर असून, ती अत्यंत खर्चीक आहे. त्यातील आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी अधिष्ठाता गट स्तरावर अभ्यास करण्यात येत असून त्याचे प्रशिक्षण क्लिष्ट असल्याने र्सवकष विचारविनिमय करून यांत्रिक शस्त्रक्रियेची आवश्यकता व आर्थिक व्यवहार्यता पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पहिल्या अभिप्रायात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे नगरसेवकांनी तो फेटळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 12:45 am

Web Title: mechanical surgery department of the bmc only on paper abn 97
Next Stories
1 नऊ दुर्गाचा उद्या सन्मान
2 मतदानावर पावसाचे सावट!
3 दिवाळीतही पाऊस?
Just Now!
X