रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळताच पश्चिम रेल्वेवर दोन लोकल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील एक महत्त्वाचा घटक असलेली संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘मेधा’ लोकल येत्या महिन्याभरात मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. या लोकलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या असून लखनऊ येथील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही या लोकलला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. आता ही लोकल चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेला असून दोन ते तीन आठवडय़ांमध्ये त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळाल्यावर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ही नवी लोकल दाखल होणार आहे.

उपनगरीय रेल्वेमार्गावर चालणाऱ्या एमयूटीपी-१ योजनेअंतर्गत आलेल्या सिमेन्स आणि एमयूटीपी-२ अंतर्गत आलेल्या बंबार्डिअर या दोन्ही गाडय़ा परदेशी बनावटीच्या आहेत. या गाडय़ांमधील विद्युत प्रणाली बंबार्डिअर आणि सिमेन्स या कंपन्यांनी बनवली असल्याने त्या गाडय़ांना त्याच नावाने ओळखले जाते. मात्र पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली मेधा ही गाडी चेन्नईच्या इंटीग्रेटेड कोचिंग फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली असून या गाडीची विद्युत यंत्रणा हैदराबाद येथील ‘मेधा सव्हरे ड्राइव्ह’ या कंपनीने तयार केली आहे. त्यावरूनच या गाडीला ‘मेधा’ असे नाव पडले आहे.

काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेमध्ये आलेल्या या गाडीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांबाबत समाधान व्यक्त करून पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या गाडीबाबतचा अहवाल मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवला होता. मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही या गाडीला सुरक्षा प्रमाणपत्र देत ही गाडी चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, ही गाडी मुंबईकरांच्या सेवेत येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी दिली.

ही गाडी प्रवाशांच्या पसंतीला उतरली, तर यापुढे ‘मेधा’ लोकल मोठय़ा प्रमाणात ताफ्यात दाखल करून घेतल्या जातील. त्यामुळे परदेशी विद्युत यंत्रणा खरेदी करण्यासाठी येणारा खर्च मोठय़ा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

वातानुकूलित लोकलच्या चाचण्याही अद्याप सुरू झाल्या नसल्या, तरी ही गाडी लवकरच सेवेत येईल, अशी माहिती जी. सी. अग्रवाल आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा या दोघांनीही दिली. या गाडीबाबत मध्य रेल्वेला आरडीएसओच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गाडीच्या धावत्या चाचणीच्या तारखा निश्चित कराव्या लागणार आहेत. मध्य रेल्वेवर काही चाचण्या झाल्या की, गाडीच्या काही चाचण्या पश्चिम रेल्वेवरही घेण्यात येतील.

पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक वातानुकूलित लोकल आल्यानंतर आणखी नऊ लोकलही सेवेत आणण्याचा विचार सुरू असल्याचेही पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

कशी असेल मेधा’?

मेधा लोकल ही सध्या पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या बंबार्डिअर किंवा सिमेन्स या गाडय़ांच्याच तोडीची आहे. आपत्कालीन संपर्क प्रणाली, ध्वनिविस्तार यंत्र, टॉकबॅक यंत्रणा आदी अद्ययावत यंत्रणा या लोकलमध्ये असतील. त्याशिवाय ही गाडीही सध्याच्या गाडय़ांसारखीच हवेशीर असेल.