News Flash

वाक्चातुर्याने वक्तृत्व झाकोळले!

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या सोहळ्यात मेधा पाटकर यांचे मत

(संग्रहित छायाचित्र)

‘वाक्चातुर्याची नशा ही वक्तृत्वाला मारक ठरली आहे. अशा वातावरणात विचारस्वातंत्र्य आपल्या मेंदूत भिनवून व्यक्त होणे म्हणजे वक्तृत्व, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभात ओघवत्या वक्तृत्वाचा प्रत्यय मेधाताईंच्या मार्गदर्शनातून वक्त्यांना आला.

वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ पाटकर यांच्या हस्ते झाला. पाटकर यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला. ‘सत्तेच्या बाजारात उत्तम वक्तृत्वापेक्षा वाक्चातुर्य अधिक अनुभवास येते. मात्र यातील फरक आपल्याला कळायला हवा. चातुर्याचा प्रभाव मोठा असतो. मात्र त्यात खरेपणा असेलच असे नाही. भविष्य विचारातून ठरते; फक्त भाष्याच्या सादरीकरणातून नाही याचीही जाण हवी,’ असा मंत्र वक्त्यांना देऊन पाटकर यांनी सद्य सामाजिक स्थितीवरही भाष्य केले.

त्या म्हणाल्या, ‘आज करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण भयभीत झालो आहोत; परंतु त्यापेक्षा अधिक भयंकर विषाणूने समाज ग्रासला आहे. तो म्हणजे जाती आणि धर्मभेदाचा विषाणू. त्याचा उल्लेख ‘कास्ट व्हायरस आणि रिलिजन व्हायरस’ असा करणे अधिक उचित ठरेल. कारण आपल्यावरील संकटांची नावे ही नेहमीच परदेशी आहेत. या कास्ट व्हायरसने आपला समाज पोखरला आहे. एखाद्याला शिक्षा देतानाही हा जातिवाद डोकावतो. आपण सध्या ज्याला धर्म म्हणत आहोत ती खरे तर आपली अधर्माकडील वाटचाल आहे. राष्ट्रधर्म आणि मानवता धर्म हरवत चालला आहे.’

नैसर्गिक संसाधनांचा बाजारू साधनांसारखा वापर करणे. त्याचबरोबर माणसाची करुणेची नैसर्गिक भूक नाकारणे हे अनेक प्रश्नांचे कारण आहे, असेही त्या म्हणाल्या.

विचारवंतांचे विभाजन नको

स्पर्धक वक्त्यांनी मांडलेल्या विषयांचा परामर्श पाटकर यांनी घेतला. ‘विचारधारा – एक समृद्ध अडगळ’ या विषयाच्या संदर्भात त्या म्हणाल्या, ‘विचारधारा मांडताना विचारवंतांचे सर्रास विभाजन केले जाते. मात्र विचारवंतांची, विचारधारांतील साम्यस्थळे लक्षात घ्यायला हवीत, मोकळेपणाने स्वीकारायला हवीत. गांधीजी विरुद्ध भगतसिंग   अशी मांडणी केली जाते तेव्हा ‘सर्व प्रश्नांवर हिंसा हे उत्तर नाही’, हे भगतसिंग यांनीही मान्य केले होते याचा आपल्याला विसर पडतो. वैचारिक विविधता हे आपले धन आहे. विचारधारांवर किंवा विचारवंतांबाबत व्यक्त होताना वैचारिक विविधतेबाबत सहिष्णुता बाळगली नाही तर त्या वक्तृत्वाचा काहीही उपयोग नाही.’

प्रायोजक  : ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर, अशा आठ केंद्रांवर  झाली. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’, नॉलेज पार्टनर ‘चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’ हे आहेत.

दिलगिरी..

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या सूचनेनुसार ‘लोकसत्ता वक्तृत्व’ स्पर्धेची महाअंतिम फेरी ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांना सभागृहात प्रवेश देता आला नाही. वाचकांना आणि वक्तृत्वप्रेमींच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. – संपादक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:48 am

Web Title: medha patkars vin the function of lokasatta vakta dashashresharu abn 97
Next Stories
1 करोनाचा कहर : राज्यात आणखी सात जणांना संसर्ग
2 मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार केल्यास कारवाई
3 कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद
Just Now!
X