मुंबई : राज्यातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशाची स्पर्धा यंदा अधिकच तीव्र होणार असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (नीट) राज्यातील अर्जामध्ये जवळपास १२ हजारांनी वाढ झाली आहे.

अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकडील विद्यार्थ्यांचा कल घटत असताना वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय पदवी (बीडीएस) प्रवेशाची स्पर्धा अधिकच तीव्र होत आहे. यंदा यामध्ये अधिकच भर पडण्याची शक्यता आहे. नीटसाठी राज्याच्या स्तरावरून आलेल्या अर्जामध्ये जवळपास १२ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यातील २ लाख १६ हजार १७६ विद्यार्थ्यांनी नीटसाठी अर्ज केला होता. यंदा ही संख्या २ लाख २८ हजार ८२९ वर पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणेच परीक्षा देऊ इच्छिणारे सर्वाधिक विद्यार्थी राज्यातील आहेत.

देशभरातून आलेल्या एकूण अर्जामध्येही साधारण ७८ हजारांची वाढ झाली आहे. यंदा देशभरातून १५ लाख ९४ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ३ मे रोजी होणार असून आहे.