20 November 2017

News Flash

आणखी ४ स्थानकांवर सेवा

गेल्या नऊ दिवसांत दोन रेल्वे अपघातांतील प्रवाशांवरही या चिकित्सालयात उपचार करण्यात आले.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 20, 2017 2:44 AM

रेल्वे स्थानकांवर १ रुपयांत वैद्यकीय तपासणी

घाटकोपर पूर्वेला एक रुपयात वैद्यकीय सेवा देणारे मुंबईतील पहिले चिकित्सालय सुरू झाल्यानंतर शनिवारपासून दादर, मुलुंड, कुर्ला, वडाळा रोड या स्थानकांजवळही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. घाटकोपर येथे १० मेपासून सुरू झालेल्या चिकित्सालयात पहिल्या नऊ दिवसांत ७०० हून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

रेल्वेवर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जखमी प्रवाशांना तातडीने प्रथमोपचार मिळावे, त्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना सुलभ व परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईतील स्थानकांजवळ ही चिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. शनिवारपासून दादर पूर्वेकडील हनुमान मंदिराच्या शेजारी, मुलुंड पश्चिम व कुर्ला पूर्वेला एका रुपयात वैद्यकीय सेवा ही चिकित्सालये सुरू करण्यात येतील, तर वडाळा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच हे चिकित्सालय सुरू करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी घाटकोपर चिकित्सालयात एका खासगी कंपनीत काम करणारे गृहस्थ रक्ताची तपासणी करण्यासाठी आले होते. त्यात त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ३०० हून अधिक असल्याचे स्पष्ट झाले. रक्तात २०० हून अधिक साखरेचे प्रमाण असेल तर मधुमेहाची लागण होते. हे पाहून त्यांना धक्काच बसला. कामामध्ये व्यस्त असल्याने डॉक्टरांकडे ही रक्तातील साखर, हिमोग्लोबीन आदी तपासणी केलीच जात नाही. मात्र आता मधुमेहावरील उपचार त्यांनी सुरू केले आहेत.

गेल्या नऊ दिवसांत दोन रेल्वे अपघातांतील प्रवाशांवरही या चिकित्सालयात उपचार करण्यात आले. घाटकोपरमधील एका रुपयात वैद्यकीय सेवा या चिकित्सालयात सुरुवातीला त्या परिसरातील रुग्णांनी विविध वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. मात्र कालांतराने डोंबिवली, ठाणे येथील प्रवाशीही या चिकित्सालयात तपासणी करण्यासाठी येत आहेत. घाटकोपरप्रमाणे इतर स्थानकांवरही चिकित्सालय आणि शेजारी औषधांची दुकाने असतील. येथे जेनेरिक म्हणजे स्वस्त दरातील औषधेही उपलब्ध आहेत. रविवारी एका रुपयात वैद्यकीय सेवा या उपक्रमाचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश मंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

नऊ दिवसांत ७०० रुग्णांची तपासणी

घाटकोपर स्थानकाशेजारी नऊ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या चिकित्सालयात ७०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०० रुग्णांना मधुमेह असल्याचे तपासणीत उघड झाले, तर त्याखालोखाल ११५ रुग्णांना रक्तदाबाचा त्रास होत होता. यातील अधिकतर रुग्ण हे ४० ते ७० च्या आतील होते. सध्या जीवनशैली बदलत असल्यामुळे नियमित रक्त, साखर व रक्तदाब तपासणे आवश्यक असते. मात्र या तपासणीसाठीही डॉक्टर अधिक पसे आकारतात, तर सरकारी रुग्णालयातील गर्दी पाहून येथेही जाणे टाळले जाते. मात्र एका रुपयात ही तपासणी उपलब्ध असल्यामुळे नागरिक आरोग्याबाबत अधिक सजग राहतील, असे या चिकित्सालय उपक्रमाचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

First Published on May 20, 2017 2:44 am

Web Title: medical check up on railway station