शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये २००६ मध्ये संगणक प्रणाली आणून कारभार गतिमान करण्याच्या योजनेचे बारा वाजले आहेत.

एकूण १६ मोडय़ुलपैकी १० मोडय़ुलची अंशत: अंमलबजावणी झाली तर पाच मोडय़ुलची १४ वैद्यकीय महाविद्यालये व १९ संलग्न रुग्णालयांपैकी एकाही ठिकाणी सुरू झाले नसल्याचे कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी संगणक प्रणालीत रुग्णांच्या वयाची नोंद १०० वर्षे पासून ५०० वर्षांपर्यंत करण्यात आली आहे, तर रुग्णांच्या संख्येपेक्षा किती तरी पट अधिक रुग्ण रुग्णालयात असल्याची नोंद झालेली दिसते.

वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांच्या संगणकीकरणानंतर सर्व माहिती मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध होणे अपेक्षित होते तसेच रुग्णांच्या माहितीच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाणे अपेक्षित होते. आजघडीला १९ पैकी १६ रुग्णालयांत कामकाज हस्तलिखित पद्धतीनेच होत आहे. एकूण १६ मोडय़ुल वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या दृष्टीने करणे अपेक्षित होते. यात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंद, वैद्यकीय सल्ला, औषधांची माहिती तसेच चाचण्यांचा तपशील आदींनी संगणकीय नोंद असणे अपेक्षित होते. आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रियांचे वेळापत्रक, भांडार व्यवस्थापन, औषधे व यंत्रसामग्री खरेदी नोंद, रक्तपेढी सेवा, आहार व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, वित्त, विद्यार्थी व्यवस्थापन, वाचनालय व्यवस्थापन आदी १६ मोडय़ुलपैकी बहुतेक मोडय़ुल केवळ कागदावरच आहेत. ज्या प्रणाली सुरू आहेत त्यातही गोंधळ असल्याचे दिसून येते.

अहवालात काय?

कॅगच्या तपासणीत १७३९ प्रकरणांमध्ये रुग्णाच्या वयाची नोंद १०० वर्षे दाखविण्यात आली आहे तर २६९ प्रकरणांमध्ये रुग्णाचे वय ५०० वर्षे दाखविण्यात आले आहे. २०१७-१८ मधील माहितीचे विश्लेषण करताना असे दिसून आले की, १६ ठिकाणी उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या ८,५५,०२२ रुग्णांपैकी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणालीत केवळ १,७०,४७७ रुग्णांनाच घरी सोडण्यात आल्याचे दिसून येते. शस्त्रक्रियांची माहिती, रुग्णालयातील खाटा व रुग्णांची संख्या यांचे प्रमाणही प्रणालीत व्यस्त दिसून आले. डॉक्टरांनी रुग्णांना लिहिून दिलेल्या औषधांपेक्षा जास्त औषधे दिल्याचे व रुग्णसंख्याही खूप अधिक असल्याचे संगणक प्रणालीत दिसून आले. सर्व मोडय़ुल्सची अंमलबजाणी करण्याबरोबरच माहितीच्या सुरक्षेची खातरजमा करण्यात यावी अशी शिफारस कॅगने आपल्या अहवालात केली आहे. तसेच संगणक प्रणालीच्या माध्यमातूनच सर्व देयके देण्यात यावी असेही यात नमूद केले आहे.