आराखडा ३१ ऑक्टोबपर्यंत सूचनांसाठी खुला

देशात वैद्यकीय आणि आरोग्य अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांनाही येत्या काळात राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषदेची (नॅक) श्रेणी मिळवणे बंधनकारक होण्याची शक्यता असून नॅकने या संस्थांसाठीचे निकष तयार केले आहेत. ही श्रेणी मिळवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक असणे, प्राध्यापकांनी संशोधनात रस घेणे, परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणे, अभ्यासक्रम अद्ययावत ठेवणे, अशी आव्हाने संस्थांना पेलावी लागतील.

देशात सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमांची महाविद्यालये, विद्यापीठे यांना नॅकची श्रेणी घेणे बंधनकारक नाही.  आता वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान महाविद्यालयांसाठी नॅकने स्वतंत्र निकष तयार केले आहेत. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, फिजिओथेरपी, परिचर्या, सार्वजनिक आरोग्य, जैववैद्यकीय अभ्यासक्रम, औषधनिर्माण आणि आयुष विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांना हे निकष लागू राहणार आहेत. मात्र ज्या विद्यापीठांमध्ये आरोग्य किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम हे ६० टक्क्यांपेक्षा कमी असतील त्यांच्यासाठी इतर विद्यापीठांसाठी असलेले निकष लागू होतील.

चांगली श्रेणी मिळवण्यासाठी महाविद्यालयातील अध्ययन- अध्यापनासोबतच संशोधन, विद्यार्थ्यांमध्ये प्रतिमा तयार करणे, पायाभूत सुविधा देणे यांसाठी संस्थांना मेहनत घ्यावी लागणार आहे. निकषांबाबत नॅकने तयार केलेला आराखडा सूचनांसाठी खुला करण्यात आला असून तो नॅकच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावर ३१ ऑक्टोबपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत.

गुण कशाला?

वैद्यकीय आणि आरोग्य अभ्यासक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या निकषांमध्ये सर्वाधिक गुण हे संशोधनासाठी आहेत. शिक्षक, विद्यार्थ्यांकडून केले जाणारे संशोधन, आंतरराष्ट्रीय शोधनियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले शोधनिबंध यात आघाडी घेणाऱ्या संस्थांना चांगली श्रेणी मिळू शकते. त्यानंतर शिक्षकसंख्या, पायाभूत सुविधा, परीक्षा प्रक्रिया यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय अभ्यासक्रम अद्ययावत असणे, विद्यार्थ्यांचे मत, शिक्षण पद्धती, व्यवस्थापन आणि मूल्य असे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

वैद्यकीय आणि आरोग्य अभ्यासक्रमांच्या मूल्यांकनासाठी समितीने मूल्यांकन आराखडा तयार करून नॅककडे दिला आहे. वैद्यकीय काऊन्सिलकडून नॅक बंधनकारक असल्याबाबत अद्याप काही सूचना आलेली नाही. मात्र ती आल्यास त्यानुसार महाविद्यालयांना नॅकची श्रेणी मिळवावी लागेल.    – डॉ. प्रवीण शिणगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक