|| संदीप आचार्य

इमारतीत उंदीर, घुशींचा सुळसुळाट; छतांनाही गळती

राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालय म्हणजे उंदीर व घुशींचे हक्काचे निवासस्थान बनले आहे.. छताचे प्लास्टर कधी डोक्यावर पडेल ते सांगता येत नाही. कोणत्या कपाटातील फाईलला वाळवीचा विळखा असेल हे सांगणे कठीण आहे. काही वेळा आम्हाला वाळवीने भरलेली फाईल कपाटातून काढून संचालनालयाच्या खाली नेऊन रॉकेलने जाळावी लागते.., हे अस्वस्थ करणारे उद्गार आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचे.

सेंट जॉर्ज रुग्णालयात चौथ्या मजल्यावर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे मुख्यालय आहे. तेथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य संचालनालयाच्या आठही मजल्यांवर वाळवीचे साम्राज्य पसरले आहे. याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने भ्रमणध्वनी करून आमच्या कार्यालयातही प्रचंड वाळवी आहे. उंदीर व घुशींचा सुळसुळाट असून अनेक ठिकाणी छतातून गळती आहे. तुम्ही लिहिल्यास कदाचित कारवाई होईल, अशी विनंती केली. सेंट जॉर्ज दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर वैद्यकीय शिक्षण संचालनालय आहे. येथून राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कारभाराचे नियमन केले जाते. नवीन शासकीय महाविद्यालये निर्माण करताना वैद्यकीय शिक्षण संचालनालयात मात्र पुरेसा कर्मचारीवर्ग शासनाकडून दिला जात नाही. अपुरे कर्मचारी तसेच अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे आधीच या संचालनालयातील कर्मचारीवर्ग त्रस्त असून सहा महिन्यांपूर्वी विभागाच्या नूतनीकरण केलेल्या बैठकीच्या हॉलमध्ये पावसात सर्वत्र गळती झाली. येथील लाकडी फर्निचर खराब झाले आणि जागोजागी वाळवी पसरली. या मजल्यावरील प्रशासकीय विभागात गेले वर्षभर छताच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जागोजागी प्लास्टर पडत असून केवळ काही ठिकाणी सिमेंट लावून कंत्राटदार अर्धवट काम सोडून बसून राहातात. त्यांना विनंती केल्यास, कधी आमचे पैसे मिळाले नाही तर कधी माणसे नाहीत असे उत्तर दिले जाते, असे संचालक डॉ. शिनगरे यांचे म्हणणे आहे. उंदीर व घुशींनी विभागात जागोजागी पोखरून ठेवले आहे. वाळवी कोणत्या कपाटातून बाहेर पडेल याचा नेम नाही. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रे लिहिली आहेत. दर सहा महिन्यांनी पत्र पाठवत असतो, ते काय दर्जाचे काम करतात हे तुम्हीच पाहा, संतप्त उद्गार डॉ. शिनगरे यांनी काढले.

टांगती तलवार

एक-दोन वेळा छताचे प्लास्टर कोसळले तेव्हा नेमके कर्मचारी जेवण्यासाठी गेले होते. अन्यथा त्यांच्या डोक्यावर ते कोसळले असते. वर्षभर कंत्राटदाराच्या मागे लागूनही प्लास्टर, फॉलसिलिंगचे काम केले जात नाही. उंदीर-घुशी आणि वाळवीच्या सहवासात, छताचे प्लास्टर कधीही डोक्यावर कोसळेल या टांगत्या तलवारीखाली आम्ही काम करतो, हे येथील कर्मचाऱ्यांचे उद्गार पुरेसे बोलके आहेत.