मुंबई : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता १० जूनपासून सुरू होणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विविध परीक्षा येत्या २ जूनपासून घेण्याचे नियोजन होते, परंतु करोना साथीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. करोना परिस्थितीचा आढावा घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने या परीक्षा येत्या १० ते ३० जूनदरम्यान घेण्याचे जाहीर केले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससीबरोबरच नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा १० जूनपासून सुरू होतील.