तीन वर्षांपूर्वीच्या ‘नीट’ परीक्षा गोंधळाचा शासकीय रुग्णालयांना फटका
पावसाळ्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे व जास्त खाटांची सोय केली गेली असली तरी रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचाच तुटवडा भासणार आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘नीट’ परीक्षांच्या गोंधळाचा फटका यावर्षीच्या पावसाळ्यात हजारो गरीब रुग्णांना बसणार आहे.
बॉण्डद्वारे गेल्या वर्षी जुलैपासून रुग्णालयात काम करत असलेल्या एमडी डॉक्टरांची सेवा जूनमध्ये संपणार असून २०१३ मध्ये एमडीचा प्रवेश लांबल्याने यावर्षी परीक्षा उत्तीर्ण होऊन एमडी डॉक्टर बॉण्डची सेवा सुरू होण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात पालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयात सुमारे ११००तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकणार
नाहीत.
पावसाळ्यातील साथीच्या आजारांमुळे रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे मुंबईच्या केईएम, नायर व लोकमान्य टिळक रुग्णालयात खाटांची अधिक व्यवस्था करण्यात आली असून औषधांचा साठाही वाढवण्यात आला आहे.
मात्र रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरांचाच तुटवडा आहे. तीन वर्षांपूर्वी झालेला ‘नीट’ परीक्षांचा गोंधळ या सर्व प्रकारासाठी कारणीभूत आहे. ‘नीट’ परीक्षांद्वारे प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात खासगी महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे एमडी, एमएसचे प्रवेश ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडले. एमडी, एमएस अभ्यासक्रमासाठी ३६ महिने पूर्ण भरण्याचा भारतीय वैद्यकीय परीषदेचा नियम असल्याने यावर्षी मे महिन्यात परीक्षा घेण्यास निवासी डॉक्टरांनी विरोध केला. ३६ महिने पूर्ण न झाल्यास पदवीचीच मान्यता रद्द होण्याचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंडळानेही परीक्षा १५ जुलैपर्यंत लांबणीवर टाकली, अशी माहिती मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी दिली.
त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
राज्यभरात सुमारे ११०० डॉक्टर यावर्षी एमडीची परीक्षा देत आहेत. पालिकेतील २५० डॉक्टर वगळता राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ८५० स्पेशालिस्ट डॉक्टरांची सेवाही सप्टेंबरनंतर सुरू होणार आहे. शासकीय रुग्णालयात काम करण्यासाठी डॉक्टरांचे अर्ज येत आहेत. त्यांना सामावून घेतल्यास पावसाळ्यात डॉक्टरांचा तुटवडा भासणार नाही.
– डॉ. प्रवीण शिणगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक
ल्ल लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होऊन निकाल येईपर्यंत सप्टेंबर अखेर होणार असून त्यानंतर बॉण्डच्या सेवांना सुरुवात केली जाईल. त्यामुळे जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यात एमडी स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता जाणवणार आहे.
ल्ल एमबीबीएसला शिकणारे तसेच निवासी डॉक्टर उपलब्ध असले तरी पालिका रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यातच स्पेशालिस्ट डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया तसेच उपचारांसंदर्भात समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, असे पालिकेतील वरीष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले.