News Flash

वैद्यकीय निष्काळजीच्या आरोपांची चौकशी आवश्यक

करोनावरील उपचारांबाबत याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पोलिसांचा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई : वैद्यकीय निष्काळजीच्या आरोपांची चौकशी वा तपासासाठी या विषयांतील ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याबाबत विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला केली. रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे डॉक्टरांचा नाहक छळ होऊ नये या उद्देशाने हा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

करोनावरील उपचारांबाबत याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी वैद्यकीय निष्काळजीमुळे रुग्ण दगावल्याचे उघड झाले तरच डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्ट करण्यात आल्याचे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर प्रत्येकवेळी नातेवाईक चुकीचेच असतील, असे म्हणता येणार नाही. त्यामुळेच कोणत्या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कोणत्या नाही याबाबत पोलिसांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्याचबरोबर वैद्यकीय निष्काळजीच्या आरोपांच्या चौकशीसाठी या विषयातील ज्ञान असलेल्या व प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा स्वतंत्र विभाग सुरू करायला हवा. राज्य सरकारने तो सुरू करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली.

पोलिसांना वैद्यकीय निष्काळजीच्या प्रकरणांबाबत कायदे काय सांगतात याबाबत फारशी माहिती नाही. त्यांचे प्रबोधन करणे अनिवार्य आहे. राज्य सरकारने या प्रकरणी निर्णय घ्यावा. तो निर्णय समाधानकारक वाटला नाही तर आम्ही योग्य तो आदेश देऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 1:09 am

Web Title: medical negligence high court independent department of police officers akp 94
Next Stories
1 समाजसेविका राणी पोद्दार यांचे निधन
2 ‘आरटीओ’त चालकाला वाहन चाचणी न देताच ‘लायसन्स’
3 आदिवासी बालकांचे आरोग्य टांगणीला!
Just Now!
X