राज्यातील शेतकरी अत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना ‘महात्मा फुले जीवनदायी योजने’च्या माध्यमातून प्रभावी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ४१२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती अंतिम टप्प्यात असून एकूणच आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी दीड हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
येत्या दोन ऑक्टोबरपासून राज्यात ‘महात्मा फुले जीवनदायी योजना’ राबविण्यात येणार आहे. राज्यात बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण जास्त असलेले ७८ विभाग असून यातील १६ विभागांत हे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुपोषणाचे प्रमाणही ४० टक्क्य़ांवरून ३३ टक्क्य़ांवर आले असले तरी राज्य कुपोषणमुक्त करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले. कुपोषण निर्मूलनाच्या सर्व योजना एका छत्राखाली आणून तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कुपेषणाचे प्रमाण वेगाने खाली आणता येईल, अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी मांडली.