खासगी महाविद्यालयांकडून प्रवेश देण्यास ऐन वेळी नकार

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने प्रवेश देऊनही प्रत्यक्षात खासगी संस्थांकडून ऐन वेळी प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे समोर येत आहे. शुल्क नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले शुल्क महाविद्यालयांना मान्य नसल्यामुळे ‘आम्ही सांगू तेवढे शुल्क भरा नाही तर प्रवेश घेऊ नका,’ अशी भूमिका महाविद्यालये घेत आहेत. महाविद्यालयांकडून करण्यात येणारी अडवणूक आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची थंड भूमिका यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) वैद्यकीय पदव्युत्तर (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांसाठीची पहिली प्रवेश यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयांत ६ ते १२ एप्रिल या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. राज्यात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये पंधराशे, तर खासगी महाविद्यालयांमध्ये चारशे जागा आहेत. मात्र या अवघ्या दोन हजार जागांसाठी हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. अत्यंत चुरशीतून प्रवेश यादीत आपले नाव दिसल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने शुक्रवारी मिळालेले महाविद्यालय गाठले. मात्र तेथे विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत.

शिक्षण शुल्क प्राधिकरणाने निश्चित केलेले शुल्क महाविद्यालयांना मान्य नाही. त्यामुळे शुल्क वाढवून हवे, परदेशी विद्यार्थी, व्यवस्थापन कोटा यांसाठी अतिरिक्त शुल्क घेण्याची मुभा असावी, अशा मागण्यांसाठी संस्थांकडून आता विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क भरण्याबाबतही काही महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आहे.

विद्यार्थी काय म्हणतात?

महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देताना प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क हादेखील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा घटक असतो. शुल्क नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले शुल्क पाहून विद्यार्थी महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम निश्चित करत असतात. आता अचानकपणे काही महाविद्यालयांकडून प्राधिकरणाने जाहीर केलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट शुल्क मागण्याचे प्रकार घडत आहेत. प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क हे लाखो रुपयांच्या घरात असते. इतके शुल्क आयत्या वेळी कसे उभे करायचे, असा विद्यार्थ्यांपुढील प्रश्न आहे. त्याचप्रमाणे हे शुल्क भरण्यासाठी बहुतेक विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेतात. हे कर्ज घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्याची पावती आणि शुल्क नियमन प्राधिकरणाने शुल्क निश्चित केले असल्याचे पत्र आवश्यक असते. मात्र ही कागदपत्रे देण्यासही महाविद्यालयांनी नकार दिल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

सोमवारी आढावा

खासगी महाविद्यालयांनी प्रवेश नाकारण्याची भूमिका घेतली आहे. प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची सुरुवात शुक्रवारी झाली आहे. किती महाविद्यालयांनी प्रवेश दिले अथवा नाकारले याबाबत सोमवारी आढावा घेण्यात येईल आणि त्याबाबतची परिस्थिती शासनासमोर मांडण्यात येईल. मात्र प्रवेश नाकारण्यात येत असतील तर विद्यार्थी प्रवेश परीक्षा कक्षाकडे तक्रार करू शकतात.

तक्रार कुठे करता येईल?

  • cetcell@gmail.com
  • govmh@gmail.com
  • online@gmail.com
  • adgme@nic.in
  • grievance@mciindia.org