मुंबई : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यंदा शैक्षणिक प्रवेशांवर फारसा परिणाम होणार नसून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील साधारण २७४ जागा वाढणार आहेत.

गेल्यावर्षी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यांत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, त्याचवेळी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू करण्यात यावे असेही स्पष्ट केले होते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. त्यामुळे सप्टेंबरमध्ये न्यायालयाने निर्णय दिला तरीही अकरावीपासून विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे यंदा वैद्यकीय पदवी, तंत्रशिक्षण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांच्या आराखड्यात बदल होणार नाही. मात्र, गेल्यावर्षी लागू झालेले मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यंदा लागू होणार नाही. त्यामुळे यंदा खुल्या गटातील २७४ जागा वाढणार आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गेल्यावर्षी शासकीय महाविद्यालयांमध्ये ११६८ आणि खासगी महाविद्यालयांमध्ये ६१९ जागा उपलब्ध होत्या. त्यातील शासकीय महाविद्यालयातील २०० आणि खासगी महाविद्यालयातील ७४ जागा मराठा म्हणजेच सामाजिक, आर्थिक मागसवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या जागा यंदा खुल्या गटात समाविष्ट केल्या जातील.

विद्यार्थ्यांना आरक्षणापेक्षा त्यांच्या गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळाले पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गुणवत्तेची पाठराखण करणारा आहे, असे मत सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन चळवळीच्या सुधा शेणॉय यांनी व्यक्त केले.