खासगी संस्थाचालकांसमोर वैद्यकीय संचालनालयाचे नमते

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत कालचा गोंधळ बरा होता अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. प्रवेश नाकारणाऱ्या खासगी महाविद्यालयांवर कारवाई करण्याऐवजी संस्थांसमोर नांगी टाकत विद्यार्थ्यांना पुढच्या फेरीत सामावून घेण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता उरलेल्या सरकारी महाविद्यालयांतील जागांवरील प्रवेशासाठी पुन्हा एकदा रांगेत उभे राहावे लागणार आहे.

संस्थाचालकांनी अडवणूक केल्याने गेल्या चार दिवसांपासून सध्या खासगी महाविद्यालयांतील ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश खोळंबलेले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत जागा शिल्लक राहिल्याच तर त्यावर प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. हवे तसे शुल्क आकारण्याची मुभा मिळत नाही म्हणून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाच संस्थाचालकांनी अडवून ठेवली. शिक्षण शुल्क प्राधिकरणाने (एफआरए) शुल्क निश्चित केल्यानंतरही ते शुल्क मान्य नसल्याने राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यलयांनी पदव्युत्तर (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्यास नकार दिला आहे. मंजूर शुल्काव्यतिरिक्त अधिकचे शुल्क मागणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्यक्षात लोटांगण घालत वैद्यकीय संचालनालयाने विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याचा नवाच प्रकार सुरू केल्याचे दिसत आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली होती. राज्यात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १२०० जागांपैकी ८०० सरकारी तर ४०० खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत. या सर्व जागांसाठीची प्रवेश यादी कक्षाने जाहीर केली होती. मात्र, संस्थाचालकांच्या आडमुठेपणामुळे यातील ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना संस्थेने प्रवेश देण्यास नकार दिला आहे, त्यांनी वैद्यकीय संचालनालयाकडे अर्ज करायचा आहे. त्यांना पुढील फेरीत सामावून घेण्यात येणार आहे. ही पुढील फेरी सरकारी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी असणार आहे. मात्र रिक्त राहिलेल्या जागांसाठी दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश यादीत नाव लागले असले तरीही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळेलच याची खात्री मात्र राहणार नाही.

नेमका वाद काय?

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेत १६ खासगी महाविद्यलये आहेत. या महाविद्यालयांनी किती शुल्क घ्यावे हे शुल्क नियमन प्राधिकरणाने निश्चित केले आहे. त्यानुसार या महाविद्यालयांचा दर्जा, त्यांचा खर्च यांच्या आधारे सहा ते बारा लाख रुपयांच्या दरम्यान महाविद्यालयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र या शुल्कात वाढ करण्याबरोबरच व्यवस्थापन कोटय़ासाठी पाचपट शुल्क आकारण्याची परवानगी द्यावी, अशी महाविद्यालयांची मागणी आहे.

प्रवेशाच्या जागांचे गणित

सध्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील आठशे जागांपैकी साधारण १९६ जागांवर प्रवेश निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे या जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध असतील. मात्र पहिल्या यादीत नाव लागूनही प्रवेश न मिळालेल्या खासगी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या ४०० आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळाल्यामुळे ही मुले वरच्या गुणानुक्रमांकावरील आहेत, असे गृहीत धरून उपलब्ध सर्व जागांवर या खासगी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असे गृहीत धरले तरीही जवळपास २०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अनिश्चितता राहणार आहे. असे असले तरीही वैद्यकीय संचालनालयाकडून मात्र सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रवेश देण्यात आल्यास या फेरीत प्रवेश मिळाला नाही म्हणून पुढील फेरीतील प्रवेशाची आशा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच येणार आहे.

आताच्या फेरीतून रिक्त राहणाऱ्या जागांसाठी पुढील फेरी घेण्यात येईल. सध्या साधारण १९६ जागा पुढील फेरीसाठी असतील असे दिसत आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय कोटा, अपंग कोटा यांच्यासाठी असलेल्या काही जागाही समाविष्ट होऊ शकतील. त्यामुळे या जागांची संख्या ही ३००-३५०च्या आसपास असू शकेल त्यावर सध्या प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीत प्रवेश घ्यायचा असल्यास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे अर्ज करायचा आहे.

डॉ. प्रवीण शिणगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक