शैलजा तिवले, मुंबई

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील जवळपास १२०० वैद्यकीय उपचारांचे रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले दर वाढण्याची शक्यता आहे. आयुष्मान आणि या योजना एकत्रित राज्यभरात राबविण्यात येणार असल्याने दरांत सुधारणा करण्यासाठी लवकरच राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत निविदा काढण्यात येणार आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना जुलै २०१२ पासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत ९७१ वैद्यकीय सेवा दिल्या जातात. त्यावेळी या सेवांसाठी ठरविण्यात आलेले दर गेल्या सात वर्षांमध्ये एकदाही वाढविलेले नाहीत. त्यामुळे या योजना राबविणे परवडत नसल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून खासगी रुग्णालये करत आहेत. यासाठी जनआरोग्य योजनेमार्फत दोन वेळा दरवाढीसाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र इतक्या कमी विम्याच्या हप्त्यांमध्ये कोणत्याही शासकीय विमा कंपन्या सहभागी होण्यास तयार नसल्याने हे दर वाढू शकलेले नाहीत. आता आयुष्मान योजनेसोबत जनआरोग्य योजनेचे एकत्रितरित्या राबविण्यात येत आहे. आयुष्मान योजनेतील सुमारे ९९ टक्के लाभार्थी हे जनआरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या दोन्ही योजना एकत्रित राबविल्याने यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधीचा योजनेसाठी नक्कीच फायदा होत असल्याचे राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण केले असून यामधील वापरात नसलेले उपचार वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी रुग्णांसाठी गरजेचे असलेले गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण यासारख्या नव्या उपचारांचा समावेश केला आहे. सध्या या योजनेअंतर्गत जवळपास १२०० उपचार देण्यात येत आहेत. या योजनांचे दर वाढविण्याची प्रक्रिया सुरू असून विमा कंपन्यांसाठीच्या निविदा लवकरच काढल्या जातील. नव्या धोरणानुसार शासकीय विमा कंपन्यांसोबत आता खासगी विमा कंपन्यांनाही या निविदा भरता येणार आहेत.

त्यामुळे सुधारित दरानुसार योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. परिणामी रुग्णालयांचे दरही वाढणार असल्याने त्यांनाही या योजना राबविणे सोईस्कर जाईल, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

* सध्या जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिससाठी ५०० ते ६०० रुपये रुग्णालयांना दिले जातात.

* यामध्ये जवळपास दुपटीहून अधिक वाढ करत १११० ते १५०० पर्यत सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.

* तसेच अस्थिभंगासाठी १५ हजार ऐवजी आता २० हजार रुपये प्रस्तावित केले असल्याचे सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.