अँटिग्वा येथील डॉक्टरने उपचारांना नकार दिल्याने आपले वैद्यकीय अहवाल जे जे रुग्णालयात सादर करू शकलो नाही, असा दावा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी याने सोमवारी उच्च न्यायालात केला.

आपण आजारी असल्याने भारतात परतू शकत नाही, असा दावा चोक्सीने केल्यावर न्यायालयाने त्याला वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर केल्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला चोक्सी याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवाय आपण आजारी असल्याच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नसल्याचा दावा त्याने आणखी एका याचिकेद्वारे केला होता.

त्यावेळी न्यायालयाने त्याला वैद्यकीय अहवाल जे. जे. रुग्णालयाकडे सादर करण्यास सांगितला होता. तसेच या अहवालाचा अभ्यास करून चोक्सी भारतात परतण्याच्या स्थितीत आहे की नाही याचा यावर न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला आपला अभिप्राय देण्यास सांगितले होते.

सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी चोक्सीच्या वतीने वैद्यकीय अहवाल सादर करू नसल्याचे सांगण्यात आले. काही कारणास्तव अँटिग्वातील डॉक्टरने आपल्यावर उपचार करण्यास नकार दिला असून ही कारणे नेमकी काय होती हे मोहोरबंद पाकिटात सादर करत असल्याचेही चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले.

त्यानंतर चोक्सीची याचिका फेटाळून लावण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयातर्फे अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी केली. त्यावर वैद्यकीय कारणास्तव आपण प्रवास करू शकत नाही आणि त्यामुळे आपण भारतात परत येऊ शकत नाही, हा दावा सिद्ध करणारी कागदपत्रे चोक्सी सादर करू शकत नाही. तर त्याने ही याचिका मागे घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले. त्यानुसार चोक्सी याने याचिका मागे घेतली.