22 November 2019

News Flash

राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा आज बंद

प. बंगालमधील डॉक्टरांच्या पाठिंब्यासाठी ‘आयएमए’चा २४ तासांचा संप

प. बंगालमधील डॉक्टरांच्या पाठिंब्यासाठी ‘आयएमए’चा २४ तासांचा संप

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी पुकारलेल्या २४ तासांच्या ‘बंद’मध्ये राज्य रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग संघटना आणि खासगी डॉक्टरांची संघटनाही सहभागी होणार असल्याने राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

राज्यात एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी सेवा बंद राहणार आहेत. या संपाचा परिणाम खासगी वैद्यकीय सेवेवरही होण्याची शक्यता असल्याने  रुग्णांना तातडीने उपचार मिळणे कठीण होणार आहे.

पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी ‘आयएमए’शी संलग्न डॉक्टर शुक्रवारपासून काळ्या फिती लावून काम करत आहेत. सोमवारी देशभरातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. हा बंद सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.

या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग संघटनेने रविवारी जाहीर केले. राज्यभरातील खासगी रुग्णालयांमध्ये एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी या सेवांमधील सर्व डॉक्टर बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सेवा बंद राहतील.

रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. हिंसेचा मार्ग अवलंबणे योग्य नाही. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारनेही ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे, असे राज्य रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओनकर यांनी सांगितले.

प. बंगालमधील डॉक्टर चर्चेस तयार

पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांनी रविवारी- संपाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेची सशर्त तयारी दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे स्थळ निश्चित करावे, पण ते प्रसिद्धिमाध्यमांसाठी खुले असावे, अशी अट डॉक्टरांनी घातली आहे. गेले सहा दिवस प. बंगालमधील वैद्यकीय सेवा विस्कळीत आहे. आपत्कालीन विभाग, बाह्य़ रुग्ण विभाग, रोगनिदान विभाग बंद आहेत.

First Published on June 17, 2019 12:03 am

Web Title: medical service doctors strike ima
Just Now!
X