किरकोळ विक्री (रीटेल) क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध आणि केंद्राच्या नव्या ‘फार्मा-पॉलिसी’ च्या विरोधात केमिस्ट असोसिएशनच्या औषधविक्रेत्यांनी आज (शुक्रवार) एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरातील पन्नास हजारांहून अधिक औषध दुकाने आज बंद राहणार आहेत.
”नवीन ‘फार्मा पॉलिसी’मध्ये औषधविक्रेत्यांचा नफा कमी होण्याची शक्यता असल्याने तो आता आहे तेवढाच राहावा, ही प्रमुख मागणी आहे. परकीय गुंतवणूक उत्पादन किंवा संशोधनापुरती असावी. औषध दुकानात फार्मासिस्ट ठेवावा, या अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, त्यासाठी औषध विक्रेत्यांना थोडा अधिक अवधी मिळणे आवश्यक आहे, असं असेसिएशनच्या पुणे शाखेचे सचिव विजय चंगेडिया म्हणाले.
औषधनिर्मिती कायद्यात २००८ साली काही सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांची अंमलबजावणी करताना औषध विक्रेत्यांची चूक नसल्यास त्यांच्यावर हकनाक कारवाई नको अशी आमची भूमिका आहे. औषध उत्पादक कंपनीच्या चुकीबद्दल वितरक व विक्रेत्यांना जबाबदार धरले जाऊ नये, अशीही असोसिएशनची मागणी आहे.
बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी ग्राहकांना काही विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करता येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 11:08 am