औषधांचा योग्यरितीने वापर व्हावा आणि चुकीच्या पद्धतींमुळे रुग्णांना होणारा त्रास टळावा या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने औषधांच्या चिठ्ठीचे नवे आदर्श प्रारूप (मॉडेल मेडिसीन प्रीस्क्रिप्शन फॉरमॅट) जाहीर केले आहे. या चिठ्ठीत औषधाचे नाव ‘कॅपिटल’ अक्षरांत लिहिण्याची सूचना असल्याने आता डॉक्टरांची अनाकलनीय चिठ्ठी ‘वाचनीय’ होणार आहे.
नव्या बदलानुसार, औषधाच्या चिठ्ठीवर डॉक्टरांचे पूर्ण नाव, वैद्यकीय पात्रता, नोंदणी क्रमांक, पूर्ण पत्ता, रुग्णाचे पूर्ण नाव व पत्ता, लिंग आणि वय, कॅपिटल अक्षरांमध्ये औषधाचे नाव (शक्यतो जेनरिक नाव), त्याची क्षमता (पॉवर), मात्रा (डोस) आणि एकूण प्रमाण नमूद करायचे असून त्याखाली डॉक्टरांची स्वाक्षरी व शिक्का राहील. याबरोबरच औषध विकणाऱ्या दुकानदारांना दुकानाचे नाव व पत्ता, औषध देण्याची तारीख, पूर्ण औषध न दिल्यास किती दिले त्याचे प्रमाण ही माहिती नमूद करावी लागणार आहे.
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यातील तरतुदींनुसार औषधांच्या चिठ्ठीवर (प्रीस्क्रिप्शन) काय नमूद असावे याच्या स्पष्ट तरतुदी आहेत. त्यानुसार, डॉक्टरांनी औषधांची नावे लिहिताना होणाऱ्या चुका, किंवा त्यांनी वाचता न येणाऱ्या अक्षरांमध्ये औषधाचे नाव लिहिल्यामुळे विक्रेत्याकडून रुग्णांना चुकीचे औषध दिले जाऊन त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होणे आदी प्रकार टाळण्यासाठी आदर्श प्रीस्क्रिप्शन प्रारूप तयार करण्याची गरज स्पष्ट झाली होती, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकारांना सांगितले. प्रारूपाचे अनावरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले. हे प्रारूप डॉक्टर्स व औषध विक्रेते या सर्व संबंधितांना पाठवण्यात येत आहे.२८ फेब्रुवारीपासून लागू झालेल्या नव्या प्रारूपामुळे चुकीची औषधे देणे टळेल, तसेच बोगस डॉक्टरांचाही शोध लागेल, असे झगडे यांनी सांगितले.