औषध खरेदीसाठी निविदा मागविण्यात दिरंगाई; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ अनेक औषधे रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत. असे असतानाही औषध खरेदीसाठी निविदा मागविण्यात दिरंगाई झाली असून त्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. सदस्यांनी एकूणच औषध खरेदीबाबत निर्माण केलेले प्रश्नचिन्ह लक्षात घेत स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव दफ्तरी दाखल केला.

पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विविध प्रकारची तब्बल १७१ औषधे मोफत दिली जातात; परंतु यापैकी सुमारे २० ते २५ औषधेच रुग्णालयांमध्ये उपलब्ध असतात. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करीत डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्याची सूचना करतात. औषध खरेदीसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जाते. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा होत असेल तर त्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद कशासाठी करायची, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून औषध खरेदीच्या निविदा प्रक्रियेस प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांमार्फत या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली.

रुग्णालयांमधील औषधे संपून सहा-आठ महिने उलटले तरीही त्यांच्या खरेदीसाठी निविदा मागविल्या जात नाहीत. त्यामुळे पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी बाहेरील औषधाच्या दुकानांतून औषधे खरेदी करावी लागतात, असा आरोप भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी या वेळी केला. औषध खरेदीबाबत पालिका प्रशासन असंवेदनशील आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात असल्याची टीका त्यांनी केली.

पालिका रुग्णालयात देण्यात येणारी मोफत औषधे उपलब्ध नसल्याने ती बाहेरून आणण्याची सूचना रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात येते. या औषधांसाठी रुग्णांना येणारा खर्च पालिकेने द्यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली. यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या औषध खरेदीच्या प्रस्तावाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याबाबत स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत प्रशासनाकडून माहिती सादर करण्यात आली होती. मात्र आवश्यक त्या माहितीचा अभाव असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • काही तांत्रिक कारणांमुळे औषध खरेदीमध्ये विलंब झाल्याची कबुली अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या वेळी दिली. या उत्तरामुळे सदस्य संतप्त झाले. अखेर सभागृह नेते यशवंत जाधव यांनी औषध खरेदीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली आणि त्याला सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला.