रिक्षात पिशवी विसरलेल्या वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेचा दिलासा

रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने हतबल झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या तपासकौशल्यामुळे दिलासा मिळाला. रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून दागिने विकण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर गुन्हे शाखेने या पिशवीतील एका औषधाच्या पाकिटावरून या दाम्पत्याचा शोध घेतला व ती पिशवी त्यांना सुपूर्द केली.

साकीनाका परिसरात राहाणारे गोपाळ मेबीयन (७०) आणि त्यांची पत्नी गेल्या महिन्यात मंगळूरला लग्नसमारंभासाठी रवाना होणार होते. घर बंद करून काही दिवस परराज्यात जाताना दागिने विवाहित मुलीच्या घरी सुरक्षित ठेवावे, हा विचार दोघांनी केला. १६ नोव्हेंबरला ४० तोळे सोन्याचे दागिने घेऊन दोघे रिक्षाने पवईच्या दिशेने निघाले. मात्र दागिने असलेली पिशवी रिक्षात विसरले. दागिने विसरल्याची जाणीव होईपर्यंत रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. पवई पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यावरून दागिने गहाळ झाल्याबद्दल अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.

या घटनेपासून अनभिज्ञ असलेल्या गुन्हे शाखेचे (कक्ष पाच) सहायक उपनिरीक्षक संजय कदम यांना त्यांच्या खबऱ्याने एक तरुण रिक्षात सापडलेले सोने विकण्यासाठी साकीनाका परिसरात येणार, अशी माहिती दिली. कदम यांनी तातडीने ही माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना सांगितली. लगोलग कदम, सहायक निरीक्षक गणेश जाधव, महेंद्र पाटील, अंमलदार विलास वाबळे, रवींद्र राणे या पथकाने सापळा रचून दागिने विक्रीसाठी आलेल्या अजय पाल या तरुणाला ताब्यात घेतले. पालकडून ४० तोळे सोने हस्तगत करण्यात आले. पण हे सोने कोणाचे? हे अजयला ठाऊक नव्हते. नातेवाईक अजित पाल याला ते रिक्षात सापडल्याचे तो सांगू लागला. रिक्षाचालक अजितही दागिन्यांच्या मालकाबाबत सांगू शकला नाही.

पथकाने ज्या पिशवीत सोने सापडले ती तपासली तेव्हा त्यात मधुमेह आणि रक्तदाबावरील गोळ्यांची पाकिटे सापडली. या पाकिटांवर ‘क्युअर फार्मा’ या औषध दुकानाचा स्टिकर होता. पथकाने इंटरनेटवर या नावाची दुकाने शोधून काढली. त्यापैकी एक दुकान साकीनाका येथे होते. औषधी गोळ्यांची पाकिटे याच दुकानातून विकत घेण्यात आली होती, हे स्पष्ट झाले. बिलासोबत विकत घेणाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांकही पथकाच्या हाती लागला. पथकाने या व्यक्तीला संपर्क साधला तेव्हा गोपाळ मेबीयन यांनी फोन घेतला.

पवई पोलीस ठाण्यात केलेली तक्रार, तेथे नोंद असलेली ‘एनसी’, अन्य कागदोपत्री पुराव्यांवरून खातरजमा करून हस्तगत केलेले दागिने पथकाने वृद्ध दाम्पत्याला सुपूर्द केले. तसेच अजय आणि अजित यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या हवाली केले.

‘आयुष्य पुन्हा गवसले!’

‘मी निवृत्त आहे. निवृत्तिवेतनावर आमची गुजराण सुरू आहे. तेवढय़ातून धाकटय़ा मुलीचा विवाह, शिक्षण शक्य नाही. त्यामुळे या दागिन्यांचाच आधार होता. शिवाय या दागिन्यांशी आमच्या भावनाही जुळल्या होत्या. नजरचुकीमुळे क्षणात आम्ही सर्वच अर्थाने कफल्लक झालो होतो. पण गुन्हे शाखेने आम्हाला आमचे दागिनेच नाही तर हरवलेले आयुष्यच परत मिळवून दिले,’ अशा शब्दात मेबीयन यांनी भावना व्यक्त केल्या.