प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सातत्याने विविध पावले उचलणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालक व वाहक यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. वाहक व चालक यांचे मन:स्वास्थ्य उत्तम राहणे हे गरजेचे आहे. हे ओळखूनच आता वाहक व चालक यांच्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या सहकार्याने मंगळवारपासूनच राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. हे शिबीर एसटीच्या राज्यभरातील ३० विभागांत होणार आहे.
राज्यभरातील एसटीच्या ३० विभागांत कार्यरत असलेल्या चालक व वाहक यांच्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे आठवडय़ातील दोन दिवस हे शिबीर आयोजित करण्यात येईल. या शिबिरात या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जाणार आहे. सर्व विभागातील १५ चालकांना व वाहकांना दिवसभर अनुभवी तंत्रज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सोडवण्यात या शिबिराचा खूपच उपयोग होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. हा कार्यक्रम आठ ते नऊ महिने चालणार असून या शिबिराचा लाभ ३५ हजार चालक आणि ३४ हजार वाहक यांना मिळणार आहे.