12 August 2020

News Flash

प्रवासलेखन करणाऱ्या लेखिकेचा थक्क करणारा लेखनप्रवास

प्रवासवर्णन हा आजही मराठी साहित्याने पुरेसा न हाताळलेला विषय. पुलंचे ‘अपूर्वाई’, ‘जावे त्यांच्या देशा’ किंवा गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ असे सन्माननीय अपवाद वगळले, तर जगभरातल्या

| December 28, 2014 03:15 am

प्रवासवर्णन हा आजही मराठी साहित्याने पुरेसा न हाताळलेला विषय. पुलंचे ‘अपूर्वाई’, ‘जावे त्यांच्या देशा’ किंवा गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ असे सन्माननीय अपवाद वगळले, तर जगभरातल्या विविध ठिकाणांचे प्रवासवर्णन करणारी पुस्तके मराठीत खूपच कमी आहेत; पण गेल्या २३ वर्षांपासून लंडन, न्यूयॉर्क, रोम, इराण, चीन, तिबेट अशा अनेक देशांना भेटी देऊन त्या अनुभवाला शब्दबद्ध करणाऱ्या मीना प्रभू यांनी या साहित्य प्रकाराला आजही ताजेतवाने ठेवले आहे. 

तब्बल १२ पुस्तकांच्या लिखाणानंतरही मीनाताईंची ही लेखनमुशाफिरी अजूनही सुरूच असून लवकरच त्यांची तीन पुस्तके वाचकांच्या हाती पडणार आहेत.

सातासमुद्रापार देशांमध्ये भ्रमंती करून, तेथील चालीरीती, इतिहास, माणसांचे नमुने, अनुभव, खाद्यसंस्कृती यांचे सहजसुंदर आणि मिस्कील शैलीत वर्णन करणाऱ्या मीना प्रभू यांच्या पुस्तकांनी वाचनाची किंवा प्रवासाचीही आवड नसलेल्यांना आकर्षित केले आहे. विवाहानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर तेथील भटकंतीतून साकार झालेल्या ‘माझं लंडन’पासून सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास ‘मेक्सिकोपर्व’, ‘दक्षिणरंग’, ‘चिनी माती’, ‘इजिप्तायन’, ‘ग्रीकांजली’, ‘तुर्कनामा’, ‘गाथा इराणी रोमराज्य’ (भाग १ आणि २), ‘वाट तिबेटची’ या मार्गाने ‘न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, एका नगरात जग’ (भाग १ आणि २) या पुस्तकावर येऊन ठेपला आहे. ही सर्वच पुस्तके केवळ प्रवासवर्णने नाहीत, की त्यात वरदेखले वर्णन आणि आत्मचिंतनही नाही.

एखाद्या पर्यटकाला त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर उपयुक्त ठरतील, अशा ‘गाइड’ची भूमिका ही पुस्तके बजावतातच; पण त्यापुढे जाऊन त्या त्या ठिकाणचे राजकारण, अर्थकारण, धर्म, संस्कृती, इतिहास, माणसांचे स्वभाव अशा अनेक पैलूंनाही मीनाताईंची पुस्तके अतिशय जवळून स्पर्श करतात.
मग इराणमधील पुरुषसंकुचित समाजातील महिलांच्या व्यथा असोत, की रोमबाहेरच्या कॅटॅकूम्बमधील भुयारी शवागार असो, प्रत्येक ठिकाणच्या अद्भुत, कुतूहल जागवणाऱ्या गोष्टी मीनाताईंच्या पुस्तकांत पानोपानी ठाण मांडून आहेत. वयोपरत्वे माणसाची गतीही मंदावते; पण मीनाताईंचे शरीर आणि मन आजही त्याच वेगाने जगाच्या मुशाफिरीसाठी सज्ज असते. त्यामुळे ‘न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, एका नगरात जग’ या पुस्तकानंतर त्यांनी काहीसा विराम घेतला असला तरी त्यांच्या तीन आगामी प्रवासांच्या बेताने तीन नव्या पुस्तकांची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

‘प्रवासनामा’ सवलतीत
मीनाताईंच्या पुस्तकांनी अनेक घरांतील पुस्तकांच्या कप्प्यांत जागा मिळवली आहे. आजवर त्यांच्या एक लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे. आता हीच पुस्तके वाचकांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. मीना प्रभू यांच्या बारा पुस्तकांचा ‘प्रवासनामा’ हा मूळ ४६०० रुपये किमतीचा संच वाचकांना केवळ १६०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरंदरे प्रकाशनच्या या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकसत्ता’ आहे. या संचासोबत दोन हजारहून अधिक छायाचित्रांची डीव्हीडीही वाचकांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. ही योजना सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. www.pponlinestore.com या संकेतस्थळावर नोंदणी करूनही ही पुस्तके घरपोच मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2014 3:15 am

Web Title: meena prabhu a travel writer
Next Stories
1 भिवंडीत भीषण आगीचे आठ बळी
2 ‘चतुरंग’ संस्था नव्हे, विद्यापीठ!
3 नववर्षांच्या जल्लोषासाठी पर्यटकांची पसंती थायलंड, सिंगापूरला
Just Now!
X