नवदुर्गेचा जागर सुरु झाला आहे. नऊ दिवस सुरु रहाणारा हा जागर आहे आत्मसन्मानाचा, आत्मनिर्भरतेचा, स्वत:मधील दुर्बलेतेच्या दैत्याचा वध करून स्वयंप्रेरणेने नवं जीवन घडवण्याचा. आजपासून ‘शोध नवदुर्गाचा’ मध्ये आपण भेटणार आहोत अशाच नऊ नवदुर्गाना, ज्यांनी स्वत्वाचा शोध घेत सुरु केला एक नवा प्रेरणादायी अध्याय .. आजची नवदुर्गा आहे, अपंगत्वावर मात करत उद्योजिका बनलेली आणि अपंगांना स्वावलंबी बनवणारी चाळीसगाव येथील मीनाक्षी निकम.
मीनाक्षी निकम यांना वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच म्हणजे १९७५ पासून पोलिओनं अपंगत्व आलं होतं. घरची परिस्थिती हलाखीची. त्यात १२ वर्षांच्या असताना पितृछत्र हरपलं. वय वाढू लागलं तसतशा जबाबदाऱ्याही वाढू लागल्या. आई आणि चार भावंडांचा सांभाळही करायचा होता. स्वावलंबी होण्यासाठी सुरुवातीला सरकारी योजनांचा आधार मात्र अनिवार्य वाटत होता. त्यासाठी लहान भावाच्या पाठुंगळी बसून जळगाव जिल्हा कार्यालयात खेटे सुरू झाले. धडधाकट माणूसही सरकारी कामातील दिरंगाईने कावतो, तिथे मीनाक्षीताईंची परवड काय सांगावी? या सरकारी बेपर्वाईने चिडलेल्या मीनाक्षीताईंनी प्रमाणपत्र मिळताच त्या अधिकाऱ्यांसमोर ते फाडूनही टाकलं आणि बजावलं की, ‘एका प्रमाणपत्रासाठी तुम्ही मला इतका मनस्ताप दिलात ते पत्र मला आता अजिबात नको. मी स्वबळावर उभी रहाणार. इतकंच नव्हे तर कुणाही अंपगांवर ही वेळ येऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या पायावर ‘उभं’ रहायला मदत करणार.’
मीनाक्षी निकम या चाळीसगांव येथे रहाणाऱ्या दुर्गेचा हा रुद्रावतार तिथल्या अधिकाऱ्यांना काय शिकवून गेला माहीत नाही, परंतु त्यांनी मात्र आपलं बोलणं सत्यात आणलं. त्यासाठी प्रथम आधार दिला तो सुई आणि दोऱ्यानं! या दोघांशी तर त्यांची लहानपणापासून गट्टी होती. लहान वयातच घरासाठी काहीतरी करणं भाग होतं. नेमकी सुरुवात कशापासून करायची हेही उमगत नव्हतं. मग जुन्या कपडय़ांना टिपा मारून द्यायचं काम सुरु केलं. पहिली कमाई होती ५० पैसे. मग हळू हळू १ रुपयांपासून सुरू झालेला प्रवास ५० रुपयांपर्यंत गेला! आज त्यांना महिन्याला ५० हजार रुपयेसुद्धा मिळतात. पण त्या मागे आहेत प्रचंड परिश्रम. ‘‘मला शिवणकामाची आवड आहे हे लक्षात घेऊन त्यावेळी आमच्या जवळच रहायला आलेल्या दिल्लीच्या स्वाती मेहता यांनी मला फॅशन डिझाईनचं शिक्षण दिलं. त्यामुळे मी या क्षेत्रात स्वत:चं नाव मिळवू शकले,’’ असे त्या कृतज्ञतेनं सांगतात. आज ‘राज फॅशन डिझाइन’ या आपल्या कॉस्च्युम डिझाइनचा उद्योग तर त्यांनी स्वबळावर भरभराटीला आणलाच, परंतु असंख्य अपंग, विधवा, गरजू स्त्रियांना मोफत शिक्षण देत त्यांना स्वबळावर उभं केलं आहे. इतकंच नव्हे तर अपंगांच्या वाटय़ाला सरकारी मनस्ताप येऊ नये म्हणून अंपग पुनर्वसनाचेही काम त्यांनी हाती घेतले आहे. अपंगांना लागणारी साधने पुरविणे, राज्य अपंग विकास महासंघ व प्रहार क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून अपंगांना दाखले तसेच सरकारी योजनांकडून साह्य़ मिळवून देणे, यात त्या गर्क असतात. आपल्यावर झालेल्या अन्यायाने निराश न होता त्यालाच आपले शस्त्र बनवित स्वत:लाच नव्हेत तर असंख्य अपंगांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या या दुर्गेला दंडवत!
मीनाक्षी निकम, दूरध्वनी – ९६०४९२७८५२,  E-mail : mina40nikam@gmail.com

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?