अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन या दोघांना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवले होते. हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यासाठी नेपाळहून आलेल्या या उदयोन्मुख अभिनेत्रीची २०१२ मध्ये हत्या करण्यात आली होती.

मिनाक्षी थापा ही नेपाळी अभिनेत्री होती. भोजपुरी आणि हिंदी सिनेमात काम देतो असे सांगून अमित जयस्वाल आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिती सुरीन या दोघांनीही तिची फसवणूक केली. तिला मुंबईहून गोरखपूरला आणण्यात आले त्यानंतर मिनाक्षी थापाच्या वडिलांकडे १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. मात्र मिनाक्षी थापाचे वडिल फक्त ६० हजार रुपये जमवू शकले.

पैशांची व्यवस्था न झाल्याने अमितने मिनाक्षी थापाचे शीर कापून ते चालत्या बसमधून फेकून दिले तर धड एका पाण्याच्या टाकीत फेकले होते. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी अंती अमित आणि प्रिती या दोघांची नावे समोर आली. मीनाक्षी थापा आणि अमित यांची भेट मधुर भंडारकर यांच्या हिरॉइन या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमात करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.

अमितने काही सिनेमांमध्ये काम केले होते. मिनाक्षी थापाने मी श्रीमंत आहे असे अमितला सांगितले होते. त्यानंतर अमितने आणि त्याच्या प्रेयसीने मिनाक्षीच्या अपहरणाचा कट रचला. खंडणीची रक्कम मिळाली नाही तेव्हा अमितने आणि त्याच्या प्रेयसीने तिची हत्या केली. या प्रकरणात या दोघांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.