आघाडीच्या विदेशी बँकांचे भारतात तीन दशके नेतृत्व करणाऱ्या मीरा सन्याल यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती आशिष, मुलगी प्रियदर्शिनी व मुलगा जय असा परिवार आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झगडत होत्या.

सन्याल यांनी ३० वर्षांतील विदेशी बँकांमधील कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला होता. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड (आरबीएस) च्या भारतातील प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या २००९ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून तर २०१४ मध्ये ‘आप’च्या उमेदवार म्हणून अपयशी निवडणूक लढविली होती. मुळच्या कोची (केरळ) येथील सन्याल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. माजी नौदलप्रमुख दिवंगत गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांच्या त्या कन्या होत्या. हावर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील त्यांच्या मालकीच्या दोन कंपन्या आहेत. अर्थ, वित्तविषयक अनेक समित्यांवर त्या कार्यरत होत्या.