16 July 2019

News Flash

कौतुकास्पद… ही २४ वर्षीय तरुणी आहे मुंबईतील पहिली महिला बेस्ट चालक

लवकरच ती मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस चालवताना दिसणार

प्रतीक्षा दास

मुंबईमधील बेस्ट बसचे किमान भाडे पाच रुपये करण्यात आले आहे. याचा बेस्टला फायदा होतानाही दिसत आहे. आता बेस्टने बसचे स्ट्रेअरिंग थेट महिलांच्या हाती देण्याचा आणखीन एक नवीन निर्णय घेतला आहे. प्रतीक्षा दास ही पहिली महिला बेस्ट चालक होणार असून नुकतेच तिने यासंदर्भातील प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.

२४ वर्षीय प्रतीक्षाने मालाडमधील ठाकूर महाविद्यालामधून मॅकेनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून लवकरच ती बेस्टच्या सेवेत रुजू होणार आहे. ‘मला अवजड वाहनांचे प्रचंड वेड आहे. बेस्टची बस मला चालवता यावी अशी मागील सहा वर्षांपासूनची इच्छा होती. खरं तर बेस्टमध्ये प्रशिक्षण सुरु करण्याच्या आधीपासूनच मला अवजड वहाने, बाईक्स आणि कारचे प्रचंड वेड आहे. आठवीमध्ये शिकत असतानाच मामाच्या गावी मी बाईक चालवायला शिकले. त्यावेळी मी अवघ्या दोन दिवसांमध्ये बाईक चालवायला शिकले याचं मामालाही आश्चर्य वाटले होते. आता मी बाईक्स, मोठ्या चारचाकी गाड्या आणि अगदी ट्रकही सहज चालवू शकते. आणि मला त्याचा चालवताना खूप छान वाटते,’ असं प्रतीक्षा सांगते.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये बस चालवण्यासाठी प्रतीक्षा खूपच उत्सुक असल्याचे तिच्या बोलण्यावरुन जाणवते. ‘माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आरटीओ अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी मला अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवशक्य होते. त्यामुळेच आता मला बस चालवण्याची संधी मिळत असल्याने मी खूपच आनंदात आहे,’ असं प्रतीक्षा म्हणते.

गोरेगाव बस डेपोमध्ये प्रतीक्षा सध्या प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणासंदर्भात बोलताना तिने माझ्या सोबतच्या पुरुष प्रशिक्षणार्थींना तसेच शिकवणाऱ्यांना माझ्या क्षमतेवर शंका होती. ‘या मुलीला बेस्टची बस नाही चालवता येणार,’ ‘हिची उंची कमी आहे ही कशी बस चालवणार?’, असे अनेक टोमणे आपण या प्रशिक्षणादरम्यान ऐकल्याचे प्रतीक्षा सांगते. ‘मी प्रशिक्षणादरम्यान बस चालवायचे तेव्हा अनेकजण एका मुलीला बेस्टची बस चालवताना बघून थांबून मागे बघायचे. मात्र मी त्यांच्या नजरांकडे दूर्लक्ष करत बस चालवत रहायचे अशी प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी तिने सांगितल्या. लेन बदलणे आणि वळणावर गाडी चालवणे प्रतीक्षाला कठीण जायचे मात्र हळूहळू ती हे शिकत असून तिने यामध्ये चांगली प्रगती केली आहे.

महिला बस चालक असण्याबद्दल तिला प्रश्न विचारला असता, ‘खरं इच्छाशक्ती असेल आणि मनाची तयारी असेल तर महिला कोणतेही काम करु शकतात. ध्येय निश्चित करणे आणि त्यासाठी काम करण्याची तयारी असली तर काहीही शक्य आहे’ असं प्रतीक्षा सांगते. ‘मी स्वत: बस चालक होण्याचे ठरवले आणि आज मी तेच काम करत आहे. मानसिक तयारी असेल तर कोणतीही व्यक्ती स्वत:चे ध्येय सहज गाठू शकते’ असा विश्वास प्रतीक्षाने व्यक्त केला आहे.

First Published on July 11, 2019 2:33 pm

Web Title: meet pratiksha das the 24 yo breaking stereotypes by becoming mumbai first female bus driver scsg 91