राजकारण पेटले; शिवसेना आक्रमक
भाजपला कोंडीत पकडण्याकरिता जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात मांसविक्रीवरील बंदीचा मुद्दा शिवसेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीने पेटविला असून, या वादाला मराठी विरुद्ध अमराठी असा रंग देत भाजप हा फक्त बिगरमराठी लोकांचे हित जपणारा पक्ष आहे, असे चित्र उभे करण्यात आले आहे. तर शिवसेना बंदीवरून आक्रमक झाली आहे.
मांसविक्रीच्या मुद्दय़ावरून सर्व राजकीय पक्षांनी विरोधी भूमिका घेतल्याने भाजप एकाकी पडला आहे. दीड वर्षांने होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी आपापले वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला मराठी तसेच बिगर मराठी मतदारांचा पाठिंबा मिळाला होता. यातून स्वतंत्रपणे लढताना मुंबईत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. भाजपकडे वळलेला मराठी मतदार पुन्हा आपल्याकडे यावा म्हणून शिवसेना आणि मनसेने मांसविक्रीच्या बंदीच्या मुद्दय़ाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतांचे शिवसेना आणि मनसेमध्ये विभाजन होणार आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन आदी पक्षांमध्ये मराठी मते विभागली जातात. फक्त गुजराती, जैन, मारवाडी किंवा उत्तर भारतीयांच्या मतांवर भाजपचे गणित जुळू शकणार नाही. यामुळेच भाजपलाही मराठी मतांची आवश्यकता आहे. मांसविक्रीवरील बंदीच्या मुद्दय़ावर भाजप हा बिगर मराठींचा पक्ष, असे चित्र निर्माण केले गेले आहे. यामुळेच या बंदीशी भाजपचा किंवा राज्य सरकारचा काहीही संबंध नाही हे स्पष्टीकरण भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना करावे लागले. फक्त गुजराती किंवा जैनांची बाजू भाजप घेतो असे चित्र उभे राहिल्यास मराठी मतदारांच्या नाराजीचा फटका बसू शकतो. यातूनच मांसविक्रीवरील बंदीचा मुद्दा हाती घेत शिवसेनेने मराठी माणसांची आपल्यालाच काळजी आहे, असा प्रयत्न केला आहे.

 

कोणत्याही परिस्थितीत आठ दिवस मुंबईत मांसविक्रीवर बंदी घातली जाणार नाही. भाजपची दादागिरी चालू देणार नाही.  – उद्धव ठाकरे,  शिवसेना पक्षप्रमुख