आपल्या हक्काच्या निवाऱ्यावर कारवाईचा हातोडा पडूच नये यासाठी व्रतवैकल्ये झाली, होमहवन झाले, आदळआपट झाली, त्रागा आणि आक्रोशही करून झाला.. एवढे सारे करूनही कारवाईचा बडगा आता चुकणारच नाही याची पक्की खात्री झाल्यावर कॅम्पा कोलातील ८९ अनधिकृत सदनिकाधारकांनी सामानाची बांधाबांध करायला घेतली. बेघर होणाऱ्या या ८९ पैकी दहा जण एकूण २३ सदनिकांचे मालक आहेत. त्यात अगदी उद्योजकापासून ते प्राध्यापकापर्यंत आणि वैद्यकक्षेत्रातील तज्ज्ञांपासून ते संपादकपदापर्यंतच्या उच्चभ्रूंचा समावेश आहे. या दहापैकी पाच जण गेले वर्षभर कॅम्पा कोलावरील कारवाई टाळण्यासाठी झटत होते. बेघर होणाऱ्या या दहा उच्चभ्रूंची ही ओळख..
मेहता : दोन सदनिका
नंदिनी मेहता, या कॅम्पा कोला सुकाणू समितीच्या सदस्य आहेत. चहा व्यापाराच्या त्या संस्थापक तर त्यांचे पती अजय मेहता स्टील कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक. बॉयलरदर्जाच्या स्टील प्लेट्स बनवणाऱ्या त्यांच्या कंपनीचे ग्राहक आखातात जास्त आहेत. मिडटाऊन अपार्टमेंटमधील दहाव्या मजल्यावर मेहता दाम्पत्याच्या दोन सदनिका आहेत.
श्रीनिवास : दोन पेन्टहाऊस
मिडटाऊन अपार्टमेंटच्या १९व्या मजल्यावर दोन अलिशान पेन्टहाऊस श्रीनिवास दाम्पत्याच्या मालकीचे. व्ही. श्रीनिवास हिंदुजा रुग्णालयात युरोलॉजिकल आन्कॉलॉजिस्ट तर त्यांच्या पत्नी विद्या श्रीनिवास झेव्हियर इन्स्टिटय़ूटमध्ये पत्रकारितेच्या प्राध्यापिका. एका बाजूला बगिचासाठी जागा तर दुसऱ्या बाजूला पाहुण्यांसाठी खास व्यवस्था अशी त्यांच्या पेन्टहाऊसची रचना आहे.
जयकर : दोन सदनिका
ऑर्चिड अपार्टमेंटच्या बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या जयकर कुटुंबातील देवयानी या बिझनेस इंडिया समूहाच्या मालकीच्या इनसाइड आऊटसाइड या वास्तूरचना व सजावट या विषयाला वाहिलेल्या मासिकाच्या संपादक. पती टिबरेवाला बालरोगतज्ज्ञ तर मुलगा निआल पोगो वाहिनीवर निवेदक आहे.
वर्मा : एक सदनिका
सुनंदा वर्मा यांचा पादत्राणांचा व्यवसाय आहे. महालक्ष्मी येथे त्यांचे भव्य स्टोअर्सही आहे. वर्मा या कॅम्पा कोला सुकाणू समितीच्या सदस्यही आहेत.
जालान : दोन सदनिका
कन्सेप्ट पीआर ही जनसंपर्क क्षेत्रातील आघाडीची संस्था. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जालान यांच्या इशा एकता अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या व आठव्या मजल्यावर अशा दोन सदनिका आहेत.
सेठिया : दोन सदनिका
व्यवसायाने हिरे व्यापारी असलेल्या सुहास सेठिया यांच्या पटेल अपार्टमेंटमध्ये सहाव्या मजल्यावर दोन सदनिका आहेत. सुहास यांचा मुलगा करण हा कॅम्पा कोला सुकाणू समितीचा सदस्य आहे.
हिरावत : चार सदनिका
हिरावत कुटुंबियांच्या चार सदनिका कॅम्पा कोलात आहेत. कॅम्पा कोला बचाव समितीत आघाडीवर असलेले विनयचंद हिरावत स्वत मिडटाऊन अपार्टमेंटच्या सोळाव्या मजल्यावर राहतात तर त्यांच्या चुलत्यांच्या त्याच इमारतीत दोन सदनिका आहेत. विनयचंद निवृत्त झाले आहेत तर त्यांचा मुलगा अतुल स्टॉक ब्रोकर आहे. आम्ही लोकशाही असलेल्या देशात राहात आहोत यावर विश्वासच बसत नाही, असे हताश उद्गार विनयचंद काढतात.
दाणी : तीन सदनिका
दाणी कुटुंबाचा सोळाव्या मजल्यावर तीन प्रशस्त सदनिका आहेत. कुटुंबप्रमुख अशोक दाणी यांना आपले घर जाणार या कल्पनेने नुकताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला. रेडिमेड कपडय़ांचे उत्पादक व निर्यातदार असलेल्या दाणी यांचे चिरंजीव आतिश दाणी ग्राहकोपयोगी वस्तूनिर्मिती करणाऱ्या एका कंपनीच्या प्रयोगशाळेचे संचालक आहेत. कॅम्पावरील कारवाईमुळे आता आम्हाला आमचे सर्व बिऱ्हाड घेऊन भिवंडीला जावे लागणार आहे, असे आतिश यांच्या पत्नी चंचल दाणी नमूद करतात.
संघवी : तीन सदनिका
दहा सदस्य असलेल्या संघवी कुटुंबाच्या ऑर्चिड अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर तीन सदनिका आहेत. तपन संघवी निर्यातीचा पारंपरिक व्यवसाय सांभाळतात. त्यांचे कार्यालय महालक्ष्मीला आहे.
लता मंगेशकर : दोन सदनिका
इशा एकता अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर लता मंगेशकरांच्या दोन सदनिका आहेत. त्या तिथे राहात नसल्या तरी कारवाई न करण्याची मागणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली होती.