पदाधिकारी- नगरसेवकांत संघर्ष; विलंबाने आलेल्या नगरसेवकांना बैठकीचे दरवाजे बंद

पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांकडून वेळोवेळी होणारी कोंडी, विरोधकांकडून मिळत नसलेली साथ या पाश्र्वभूमीवर मेटाकुटीस आलेल्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेतील अंतर्गत धुसपूस सोमवारी चव्हाटय़ावर आली. सभागृह नेत्यांनी उशिरा आलेल्या नगरसेवकांना शिस्त लावण्यासाठी पक्षाच्या बैठकीचे दरवाजे बंद केल्याने  शिवसेना नगरसेवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून पालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी केवळ पक्षाच्या नगरसेवकांपुढे डरकाळ्या मारत असल्याची टीकास्त्र सोडण्यात आले.

महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांविरोधात सेना नगरसेवक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. इतकेच नव्हे तर पक्षप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याकडे म्हणणे मांडण्याच्या विचारात नगरसेवक आहेत.

पालिका सभागृहाची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नातील गच्चीवरील हॉटेल्सचा प्रस्ताव मंजूर करायचा होता. त्यामुळे पालिका सभागृह सुरू होण्यापूर्वी शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली; मात्र या बैठकीला काही नगरसेवक वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत. काही काळ अनुपस्थित नगरसेवकांची वाट पाहिल्यानंतर सभागृह नेते यशवंत जाधव यांनी संतापून सभागृहाचे दरवाजे बंद केले. काही नगरसेवक तेथे पोहोचले. परंतु आतून दरवाजा बंद असल्यामुळे ते तेथेच रेंगाळत राहिले.

दरम्यानच्या काळात माजी महापौर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाखातर पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद वैद्यही दरवाजे बंद असल्याचे पाहून प्रचंड संतापले. त्यांनी तीन-चार वेळा दरवाजा ठोठावल्यानंतर तो उघडण्यात आला. सभागृहात प्रवेशकर्ते झालेले मिलिंद वैद्य आणि यशवंत जाधव यांची शाब्दिक चकमक उडाली. वैद्य म्हणाले, की महापौर असताना पालिका सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येणार, पक्षाची भूमिका काय असणार याबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यामुळे सभागृहात शिवसेनेला तोंडघशी पडण्याची वेळ येत नव्हती. परंतु आता पक्षाच्या नगरसेवकांना कसलीच कल्पना देण्यात येत नाही. विरोधकांनी शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर मोठी नामुष्की ओढवते. असे अनेक प्रसंग आजतागायत सभागृहात घडले आहेत.

यावर भाजप आणि विरोधकांकडून कोंडी केल्यानंतर त्याचे खापर मात्र पक्षाच्या नगरसेवकांवर फोडायचे, अशी चर्चा करीतच शिवसेना नगरसेवक पालिका मुख्यालयातून बाहेर पडले. पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य, मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन करण्याच्या विचारात शिवसेनेचे नगरसेवक आहेत. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

‘नगरसेवकांचा वेळ वाया जातोय’

नगरसेवक बैठकीस वेळेत उपस्थित राहात नसल्याबद्दल जाधव यांनी  त्यांची कानउघाडणी केली. मात्र या प्रकारामुळे  मिलिंद वैद्य यांच्या संतापात भर पडली आणि त्यांनी सभागृह नेत्यांच्या उदासीन कृतीचा पाढा वाचायला सुरुवात केली. पालिका सभागृहाची बैठक कधीच वेळेवर सुरू होत नाही. नगरसेवक स्वत:च्या प्रभागातील मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात व्यस्त असतात. पालिका सभागृहाच्या बैठकीसाठी ही कामे सोडून नगरसेवक पालिका मुख्यालयात येतात. परंतु सभागृहाची बैठक वेळेवर सुरू होत नाही. त्यामुळे प्रभागातील मतदारांची कामे रखडतात आणि मुख्यालयात आल्यानंतर सभागृह सुरू होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. सभागृहाची बैठक वेळेवर सुरू झाली तर नगरसेवकांचा वेळ वाया जाणार नाही, असा टोला त्यांनी हाणला.

नगरसेवक पक्ष आणि पालिका सभागृहाच्या शिस्तीचे पालन करीत नाहीत. त्यामुळे ही स्थिती ओढवली आहे.

-यशवंत जाधव, सभागृह नेते