दिवाळीला काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने आजचा (रविवारी) मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र, हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना यातून दिलासा मिळालेला नाही. कारण आज हार्बर मार्गावर स. ११.४० ते दु. ४.१० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेपर्यंत स. ११.४० ते दु. ४.१० आणि चुनाभट्टी-सीएसएमटी मार्गावर स. ११.१० ते सायं. ४.४० पर्यंत सेवा खंडित राहील. तसेच सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावर स. ११.३४ ते दु. ४.२३ पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरी/गोरेगावपर्यंत स. ९.५६ ते दु. ४.१६ पर्यंत सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासह पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. ९.५३ ते दु. २.४४ पर्यंत, गोरेगाव/अंधेरी/वांद्रेहून सुटणाऱ्या लोकल स. १०.४५ ते सायं. ४.५८ पर्यंत खंडित केल्या आहेत. या कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी काही विशेष लोकल चालवल्या जातील.

दुसरीकडे, इगतपुरी येथे सिग्नल यंत्रणेत नव्याने बदल करण्यासाठी मध्य रेल्वेने दु. ३.४५ ते रा. १.४५ पर्यंत एक ब्लॉक घेतला आहे. यामुळे अनेक मेल, एक्स्प्रेस अर्धा तास ते सव्वा तास उशिराने धावतील. तर, एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, इगतपुरी-मनमाड-इगतपुरी पॅसेंजर या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.