चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा पहिला टप्पा प्रचंड नुकसानीत चालत असताना आता वडाळा डेपो ते जेकब सर्कल या टप्प्याचे काम सध्या जोरात चालू आहे. या कामात करीरोड रेल्वे स्थानकाजवळ मोनोरेलचा एक पूल बांधण्याचे काम प्रलंबित आहे. ते पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेवर १ सप्टेंबरपासून पुढील १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या दैनंदिन सेवांवर थेट परिणाम होणार नसला, तरी त्यासाठी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे.
वडाळा डेपो ते जेकब सर्कल या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम खूप वर्षे प्रलंबित आहे. हे काम डिसेंबर २०१५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक घेईल. या काळात पुलाचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली.