मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेमार्गावर देखभाल-दुरुस्तीसह काही महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीदरम्यान अनेक सेवा रद्द केल्या जातील. तसेच सर्व गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. त्यामुळे गाडय़ांना नेहमीपेक्षा जास्त गर्दी असण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांनी जीव धोक्यात न घालता स्वत:ची काळजी घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वे
कुठे – ठाणे ते कल्याण यांदरम्यान अप जलद मार्गावर
कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. या गाडय़ा कल्याण ते ठाणे यांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाण्यापुढे या गाडय़ा पुन्हा अप जलद मार्गावर वळवून त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि दादर या स्थानकांवर थांबतील.
कल्याणकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा ब्लॉकदरम्यान त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवरही थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे – वाशी ते बेलापूर यांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान वाशी ते पनवेल यांदरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-पनवेल सेवा नेरुळपर्यंतच चालवल्या जातील. तसेच पनवेल-अंधेरी यांदरम्यानच्या सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे
कुठे – सांताक्रूझ ते माहीम यांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या जलद गाडय़ा सांताक्रूझ ते माहीम या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवल्या जातील.