पत्रीपूल पाडण्यासाठी सहा तासांचा विशेष ब्लॉक ; १४० लोकल फेऱ्या रद्द

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी, १८ नोव्हेंबरला  मेगा ब्लॉक असल्याने उपनगरी प्रवाशांचे हाल होण्याचे संकेत आहेत. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली ते कल्याणदरम्यानचा जुना धोकादायक पत्रीपूल रविवारी पाडण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेतला जाईल. यादरम्यान डोंबिवली ते कल्याणदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प असणार आहे.

या कामामुळे मध्य रेल्वेच्या १४० लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.  तसेच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेवरही रविवारी चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेऊन विविध कामे करण्यात येणार आहेत.

ब्लॉकच्या कामाचा एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. मनमाड, पुणे मार्गावरील गाडय़ा रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणेदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता तर कल्याणहून सीएसएमटीसाठी ९ वाजून १३ मिनिटांनी शेवटची धिमी लोकल सुटेल.

रविवारी रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस

* मनमाड-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस

* मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

* १९ नोव्हेंबरची – मुंबई-भुसावळ पॅसेंजर

* भुसावळ-मुंबई पॅसेंजर.

* मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

* पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

* पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन

* जालना-दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस

पश्चिम रेल्वेवर ‘जम्बो ब्लॉक’

पश्चिम रेल्वे मार्गावरही रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अप-डाऊन धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. दरम्यान काही लोकल गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर ब्लॉक असल्याने हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

१८, १९ नोव्हेंबरला मुंबईतून सुटणाऱ्या गाडय़ांच्या बदललेल्या वेळा

* सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस सकाळी ११.०५ ऐवजी दुपारी ३ वाजता सुटेल.

* एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस १२.२५ ऐवजी दुपारी दीड वाजता सुटेल.

* एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस १२.४० ऐवजी दुपारी ३ वाजता सुटेल.

* एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस रविवारी रात्री ११.३५ ऐवजी सोमवारी पहाटे २.०० वाजता सुटेल.

* गोरखपूर एक्स्प्रेस, हावडा मेल, वाराणसी महानगरी एक्स्प्रेस आणि वाराणसी एक्स्प्रेसच्याही वेळा बदलण्यात आल्या आहेत.